Corona Virus in Yawatmal; १४ दिवस घरात राहिले आणि गावभर बदनाम झाले; यवतमाळ जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 05:13 PM2020-04-06T17:13:23+5:302020-04-06T18:57:39+5:30
एक सुशिक्षित तरुण स्वत:हून क्वारंटाईन झाला. पण गावकऱ्यांनी त्याला चक्क कोरोनाची लागण झाल्याची आवई उठवली. ही अफवा आजूबाजूच्या गावातही पसरली. त्यामुळे अख्खे कुटुंबच बहिष्कृत झाले.
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : परगावातून आलेल्या प्रत्येक माणसाला क्वारंटाईन राहण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना आहे. अनेक जण ती सूचना अव्हेरून गावभर फिरत आहेत. तर दुसरीकडे एक सुशिक्षित तरुण स्वत:हून क्वारंटाईन झाला. पण गावकऱ्यांनी त्याला चक्क कोरोनाची लागण झाल्याची आवई उठवली. ही अफवा आजूबाजूच्या गावातही पसरली. त्यामुळे अख्खे कुटुंबच बहिष्कृत झाले. आरोग्य ठणठणीत असूनही त्याच्याशी साधे बोलणेही लोकांनी बंद केले.
कोरोना साथीमुळे ग्रामीण भागात पसरलेल्या विषारी साईड ईफेक्टचे हे उदाहरण आहे यवतमाळ जिल्ह्यातील मुसळ गावचे. कळंब तालुक्यातील हे छोटेसे गाव. येथील संदीप भोयर हा तरुण पत्नी सुवर्णा आणि मुलगी परीला घेऊन १३ मार्च रोजी वैष्णोदेवीला दर्शनासाठी गेला होता. हे कुटुंब जनता कर्फ्यूच्या एक दिवस आधी म्हणजे २१ मार्चला गावात परतले. मात्र जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची स्थिती लक्षात घेऊन संदीपने स्वत:च क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी त्याने स्वत:ची आरोग्य तपासणीही करून घेतली. कोणतीही लक्षणे नसूनही तो १४ दिवस घरात राहिला.
एकीकडे शासनाच्या सूचना अनेक जण पाळत नसताना संदीपने समजदारी दाखविली. पण त्याचा हाच समंजसपणा गावकऱ्यांच्या मनात गैरसमज निर्माण करणारा ठरला. संदीप वैष्णोदेवीहून आला तेव्हापासून अजिबात घराबाहेर निघत नाही, म्हणजे त्याला नक्कीच कोरोनाची लागण झाली आहे, असा पक्का समज गावकऱ्यांनी करून घेतला. गावकºयांनी त्याच्याशी बोलणे सोडले. त्याच्या कुटुंबावरच जणू बहिष्कार टाकला.
या प्रकाराने संदीपचे आणि भोयर परिवाराचे सामाजिक जीवनच संपुष्टात आले. अखेर तो पुन्हा आरोग्य कर्मचाऱ्यांना भेटला. पुन्हा तपासणी करून घेतली. त्याला कोरोनाचीच काय कोणत्याच आचाराची लक्षणे आढळली नाही. मग त्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनाच विनंती केली, माझ्यासोबत गावात या आणि लोकांना समजावून सांगा. शेवटी मेटीखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी मनोज पवार, गावातील आशा सेविका विजया सोनोने, तलाठी भूमिका विथळे आणि गावचे पोलीस पाटील राजेंद्र भिसे हे संदीपसोबत गावात पोहोचले. चौकात संदीपला उभे ठेवून संपूर्ण गावकऱ्यांना गोळा करण्यात आले. पवार यांनी थेट संदीपच्या खांद्यावर हात ठेवून लोकांना आवाहन केले, संदीपला कोरोना नाही, त्याला अशा पद्धतीने बहिष्कृत करणे योग्य नाही. उलट तुमच्या काळजीपोटी तो स्वत: क्वारंटाईन झालेला असताना तुम्हीच त्याला रुग्ण ठरवून वाळीत कसे काय टाकता? यावेळी मुसळ गावातील जमलेल्या सर्व महिला-पुरुषांनी आपली चूक कबूल करून संदीप आणि त्याच्या कुटुंबाशी पुन्हा एकदा नाते जोडले.
पोलीस पाटलांनी वेळीच घेतली दखल
संदीप भोयर यांच्या कुटुंबावर कोरोनाच्या धास्तीने गावाने बहिष्कार टाकल्याची बाब लक्षात येताच पोलीस पाटील राजेंद्र भिसे, आशा सेविका विजया सोनोने यांनी तातडीने ही माहिती आरोग्य विभागापर्यंत पोहोचविली. त्यानंतर आरोग्य विभागाने संदीपचे निर्दोषत्व संपूर्ण गावापुढे सिद्ध केले. त्यामुळे एका निरोगी कुटुंबावरचे बहिष्काराचे संकट टळले.