डोळ्यांत चिकटपणा अन् आग; उन्हाळ्यात कशी घ्याल डोळ्यांची काळजी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 18:22 IST2025-03-28T18:18:44+5:302025-03-28T18:22:21+5:30
Yavatmal : कुठलाही गॉगल वापरणे ठरू शकते धोकादायक

Stickiness and burning in the eyes; How to take care of your eyes in summer?
यवतमाळ : उन्हाळ्यात डोळ्यांची विशेष निगा राखणे गरजेचे झाले आहे. अतिनील सूर्यकिरणांमुळे डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यासोबतच धूळ, झाडांची पाने हवेत उडतात. ती डोळ्यात गेल्यास संसर्गाचा धोका असतो.
धूर, धूळ, बॅक्टेरियल इन्फेक्शन कारणीभूत
उन्हाळ्यात कोरड्या वातावरणामुळे सर्वत्र धूळ उडत असते. याच काळात पानगळ होते. अनेक झाडांची फुले व बिया हवेत उडत असतात. डोळ्यांमध्ये धूळ, पानाचे अवशेष गेल्यास अनेकांना यापासून अॅलर्जी होते. केरेटो कन्झन टायव्हायरिअस या आजाराचा धोका संभवतो.
कुठलाही गॉगल वापरणे ठरू शकते धोकादायक
उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला विविध रंगाचे गॉगल्य विक्रीला असतात. डोळ्यांच्या संरक्षणासाठी अतिनील किरणांपासून वाचविणारा गॉगल हवा. तसेच पोलराईज गॉगलचाच वापर करावा. सूर्यप्रकाशात काम करताना आपण डोळा सुरक्षित ठेवू शकतो. अन्यथा रेटिनावर परिणाम होतात.
स्विमिंगपूलमध्ये पोहल्यास संसर्गाचा धोका
उन्हाळ्यात अनेकजण स्विमिंगला जातात. स्विमिंगच्या पाण्यात क्लोरीन असते. अशा पाण्यामध्ये उघड्या डोळ्याने पोहणे धोक्याचे आहे. स्विमिंगचा गॉगल लावूनच पोहल्याने संसर्गाचा धोका टाळता येतो. त्याशिवाय पोहल्यास डोळे लाल होतात व नंतर गंभीर स्वरूपाचे परिणामही दिसून येतात. त्यासाठी योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे.
"उन्हाळ्यात डोळ्यांची विशेष निगा राखावी. फलाहार घ्यावा. पुरेसे पाणी प्यावे. सोबतच उन्हात बाहेर पडताना चांगल्या दर्जाचे गॉगल्स वापरावेत. थंड पाण्याने डोळा धुवावा. त्यानंतरही काही त्रास असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा."
- डॉ. सुबोध पुरोहित, नेत्ररोगतज्ज्ञ