आशा सेविकांवर लाठीचार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 10:48 PM2019-09-09T22:48:18+5:302019-09-09T22:48:56+5:30
४ सप्टेंबरपासून साखळी उपोषण करणाºया आशा सेविकांनी सोमवारी जेलभरो आंदोलन केले. बसस्थानक चौकात रास्तारोको करण्यात आला. या आशासेविकांना नेण्यासाठी पोलिसांनी वाहनांच्या १० फेऱ्या केल्यानंतरही गर्दी कायम होती. शेवटी पोलिसांनी महिलांवर हल्ला चढविला. महिलांना ओढताण करीत, शिवीगाळ करीत वाहनात कोंबले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : किमान वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील अशा स्वयंसेविकांनी सोमवारी जेलभरो आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने तीन महिला जखमी झाल्या. मारहाण करणाऱ्या महिला पोलिसांना निलंबित करण्याची मागणी करत आशा सेविकांनी निषेध नोंदविला.
४ सप्टेंबरपासून साखळी उपोषण करणाºया आशा सेविकांनी सोमवारी जेलभरो आंदोलन केले. बसस्थानक चौकात रास्तारोको करण्यात आला. या आशासेविकांना नेण्यासाठी पोलिसांनी वाहनांच्या १० फेऱ्या केल्यानंतरही गर्दी कायम होती. शेवटी पोलिसांनी महिलांवर हल्ला चढविला. महिलांना ओढताण करीत, शिवीगाळ करीत वाहनात कोंबले.
मारेगावच्या अशा सेविका लता अनिल डाखरे यांना गंभीर मारहाण झाली. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू होता. प्रकरण अंगावर येईल म्हणून त्यांना पोलीस वाहनातून अर्ध्यातच उतरवून देण्यात आले. आणखी दोन आशा सेविकांना महिला पोलिसांनी मारहाण केली. एकीचे हात पिरगाळले. आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी हा प्रकार केल्याचा आरोप आयटकचे जिल्हा सचिव दिवाकर नागपुरे यांनी केला. या पोेलीस महिलांना निलंबित करण्याची मागणी आयटकने केली आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष दिवाकर नागपुरे, मंगला राखुंडे, उषा मुरखे, विजया तायडे, संगीता डेरे, बबिता पेंदोर, बबिता चिंचोळे, शारदा कलाने, प्रभापती वंचेवाड, राजेश्री वाठोरे उपस्थित होत्या.
शासनाने शब्द पाळला नाही
आशा सेविका आणि गटप्रवर्तकांना मानधनात तिप्पट वाढ करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र अद्यापही त्याबाबत शासननिर्णय काढला नाही. आचारसंहितेपूर्वी आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी आशा स्वयंसेविकांनी केली आहे.