ब्रिटिशकालीन पुलावरुन अजूनही वाहतूक सुरू
By admin | Published: August 5, 2016 02:37 AM2016-08-05T02:37:29+5:302016-08-05T02:37:29+5:30
तालुक्यात दोन ब्रिटीश कालीन पूल आहे. परंतु हे पूल धोकादायक असल्याच्या कारणावरुन त्याठिकाणी नव्याने पुलाची निर्मिती करण्यात आली.
धोका टाळण्यासाठी वाहतूक बंद करणे गरजेचे
कळंब : तालुक्यात दोन ब्रिटीश कालीन पूल आहे. परंतु हे पूल धोकादायक असल्याच्या कारणावरुन त्याठिकाणी नव्याने पुलाची निर्मिती करण्यात आली. परंतु जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली नाही. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करणे गरजेचे झाले आहे.
कळंब-नागपूर मार्गावरील शिरपूरजवळ वर्धा नदीवर ब्रिटीश कालावधीत दगडांचा वापर करून मोठा पूल निर्माण करण्यात आला. आत्तापर्यंत याच पुलावरून वाहतूक सुरू होती. मात्र साधारणत: दहा वर्षांपूर्वी तेथे नव्याने पुलाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे मुख्य वाहतूक आता नवीन पुलावरुन होते. परंतु अजूनही जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णत: थांबली नाही. दुचाकी, बैलगाडी, सायकल एवढेच नव्हे, तर ट्रकचीसुध्दा वाहतूक जुन्या पुलावारुन होत आहे. शिरपूर गावातील बरेचसे लोक याच पुलाचा वापर करीत आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच कळंब शहरातून वाहणाऱ्या चक्रावती नदीवरसुद्धा इंग्रज काळात दगडाने बांधलेला पूल आहे. तेथेही नजीकच्या काळापर्यंत याच पुलावरुन वाहतूक सुरु असायची. परंतु मागील पाच वर्षांपूर्वी याच ठिकाणी नव्याने पुलाची उभारणी करण्यात आली. असे असले तरीही जुन्या पुलावरील वाहतूक अद्याप सुरूच असते. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्याची गरज आहे.
शिरपूर येथील वर्धा नदी व कळंब येथील चक्रावती नदीवर नवीन पूल निर्माण होण्यापूर्वी मोठा पूर आला की जुन्या पुलावरून पाणी वाहायचे. त्यामुळे वाहतूक ठप्प पडायची. परंतु नवीन पूल निर्माण झाले तेव्हापासून कधीही पुलावरुन पाणी गेलेले नाही.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यू.व्ही.राऊत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ब्रिटीशकालीन पुलाची कुठलीही माहिती आमच्या विभागाकडे नाही. कळंब तालुक्यामधून जाणाऱ्या राज्य मार्गावर कुठलाही पूल धोकादायक असल्याचा अहवाल नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.