शारदा चौकातील मटका अड्ड्याचे ‘स्टिंग आॅपरेशन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:38 PM2018-02-10T23:38:19+5:302018-02-10T23:38:39+5:30
शारदा चौकातील पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर चालणाºया मटका अड्ड्याचे अखेर तेथील रहिवाशांनीच ‘स्टिंग आॅपरेशन’ केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शारदा चौकातील पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर चालणाºया मटका अड्ड्याचे अखेर तेथील रहिवाशांनीच ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. यातून मिळालेल्या पुराव्यांसह या अवैध व्यवसायाची तक्रार पोलीस अधीक्षक व महानिरीक्षकांमार्फत थेट राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पांढरकवडा रोडस्थित शारदा चौकात गेल्या कित्येक वर्षांपासून मटका अड्डा चालतो. आतापर्यंत तर अगदी पोलीस चौकीला लागूनच या मटक्याचे काऊंटर होते. मात्र तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी स्वत: या अड्ड्यावर धाड घातली होती. त्यानंतर काही महिने बंद राहिलेला हा अड्डा पुन्हा सुरू झाला होता. नागरिकांची ओरड होते म्हणून हाच अड्डा त्याच भागात थोडा पुढे शिफ्ट करण्यात आला. परंतु मंदिर परिसरात थाटलेल्या या मटका काऊंटरमुळे त्या भागातील ये-जा करणाऱ्या महिला-मुलींना त्रास सहन करावा लागतो. या प्रकाराबाबत त्या भागातील रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र काहीच कारवाई झाली नाही. सदर मटकाबहाद्दर पोलिसांनाही जुमानत नसल्याचे सांगितल जाते. अखेर तेथील नागरिकांनी स्वत:च या मटका अड्ड्याचे छुप्या कॅमेराने ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. प्रत्यक्ष मटका अड्डा सुरू असल्याचे डझनावर फोटो घेवून पुरावा म्हणून हे फोटो व तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह राज्यमंत्री रणजीत पाटील व अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे यांना सादर करण्यात आली आहे. या तक्रार अर्जावर अन्सार आर. अब्दुल, पी.आर. बढोत, डी.पी. शुल्का, एस.आर. पाली, बी.बी. खान, पी.पी. शेख, एस.एस. पवार, बी.पी. तूरकर, एल. मांडवकर, आर.डी. खरात, शंकर सहारे आदींचा नामोल्लेख आहे.
मटक्याचे अनेक काऊंटर
शारदा चौक, भोसा रोड व त्या परिसरात मटका, जुगाराचे अनेक काऊंटर आहेत. त्यातून लाभाचे पाट पोलिसांपर्यंत वाहतात. अनेकदा पोलीस केवळ देखाव्यासाठी या अड्ड्यांवर धाडी घालतात. छुटपूट एखाददोघांना ताब्यात घेवून खूप मोठी धाड यशस्वी केल्याचे चित्र निर्माण केले जाते. या मटका व्यावसायिकांना पोलिसातूनच खुले संरक्षण दिले जाते.
सूत्रधारांना संरक्षण कुणाचे?
अनेकदा धाडी पडूनही मटक्याचे सूत्रधार असलेल्या दोन भावांना हात लावण्याची हिंमत पोेलीस दाखवित नाही. त्याच्याकडे चिठ्ठ्या लिहिण्यासाठी असलेल्या सात-आठ माणसांपैकी धाडीच्या वेळी एक-दोघांना कागदोपत्री अटक करून लगेच सुटका करून दिली जाते. यातून पोलीस व मटका व्यावसायिकाचे संबंध किती मधूर आहेत, हे स्पष्ट होते.
जिल्हाभरच मटका-जुगाराचे अनेक अड्डे
मटका, जुगाराचे हे अड्डे केवळ शारदा चौक परिसरातच आहेत असे नाही. यवतमाळ शहराच्या अप्सरा टॉकीज, रेल्वे स्टेशन, वडगाव, पिंपळगाव, कॉटन मार्केट चौक, वाघापूर, लोहारा, भोसा रोड, कळंब, पांढरकवडा रोड या भागासह जिल्ह्यात बहुतांश पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार अड्डे राजरोसपणे सुरू आहे. अनेक ठिकाणी तर चक्क पोलीस कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हे अड्डे सुरू आहे. त्यावर धाडी घालण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याशिवाय विविध शाखा-पथके असली तरी प्रत्यक्षात ते ‘प्रामाणिकपणे’ धाडी घालतात काय? हा संशोधनाचा विषय आहे. पोलीस अधीक्षक एम. राज कुमार धंदे बंद करण्याबाबत प्रत्येकच क्राईम मिटींगमध्ये सूचना देतात. मात्र, अवैध व्यावसायिक आणि पोलीस यंत्रणासुद्धा आता ‘एसपीं’नाही जुमानत नसल्याचे स्पष्ट होते. शारदा चौकातील मटका अड्ड्याचे खुद्द नागरिकांनीच ‘स्टिंग आॅपरेशन’ करून तर आता पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेलाच आव्हान दिले आहे.
पोलिसांच्या धाडी ‘मॅनेज’, शिक्षेचे प्रमाण नगण्य
मटका, जुगार अड्ड्यावर पोलिसांकडून टाकल्या जाणाऱ्या अनेक धाडी ‘मॅनेज’ असतात. त्यामुळेच वारंवार कारवाई होऊनही अशा प्रकरणात आरोपींना शिक्षा होत नाही. पोलीस प्रशासनाने अशा प्रकरणातील खटल्यातील शिक्षेचे प्रमाण तपासल्यास सर्व काही पुराव्यानिशी सिद्ध होईल. तेच ते चेहरे पकडले जाऊनही त्यांच्यावर पुढे गंभीर स्वरूपाची कारवाई केली जात नाही. आम्ही इंधन व अन्य वरखर्च (गुन्ह्यांचा तपासखर्च निधी) भागवायचा कसा, असा सवाल करून खाकी वर्दीतून काही जण या मटका जुगाराचे समर्थन करतानाही पाहायला मिळतात.