ठोक भाजी विक्रेत्यांचा संपाचा इशारा
By admin | Published: January 18, 2016 02:31 AM2016-01-18T02:31:19+5:302016-01-18T02:31:19+5:30
अतिक्रमण हटाव मोहिमेच्या रडारवर असलेल्या ठोक भाजी विक्रेत्यांनी पर्यायी जागेवर सुविधा नसल्याचा आरोप करीत सोमवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
अतिक्रमण हटावचा परिणाम : पर्यायी जागेवर सुविधा नसल्याचा आरोप
यवतमाळ : अतिक्रमण हटाव मोहिमेच्या रडारवर असलेल्या ठोक भाजी विक्रेत्यांनी पर्यायी जागेवर सुविधा नसल्याचा आरोप करीत सोमवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. यामुळे यवतमाळ शहरातील भाजी विक्री व्यवस्था कोलमडण्याची भीती आहे तर प्रशासन पर्यायी जागेवर सुविधा देण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
यवतमाळ शहरातील ठोक भाजी बाजार गेल्या कित्येक वर्षांपासून आठवडीबाजारात भरविला जातो. सोमवार वगळता दररोज पहाटे या ठिकाणी जिल्हाभरातून आलेल्या भाज्यांचा लिलाव केला जातो. मात्र ही जागा नगर परिषदेची असून यावर ठोक भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. आता हेच अतिक्रमण काढण्यासाठी नगर परिषदेने अल्टीमेटम दिला आहे. सोमवारपर्यंत अतिक्रमण काढले नाही तर बुलडोजर चालविण्याचा इशारा दिला आहे. यामुळे हादरलेल्या ठोक भाजी विक्रेत्यांनी प्रशासनाचे दार ठोठावले. पर्यायी जागेचा शोध सुरू झाला. त्यानुसार विठ्ठलवाडी परिसरातील कॉटन मार्केट लगतची जागा देण्याचे ठरविण्यात आले. परंतु त्याठिकाणी कोणत्याही सुविधा नाही. मोकळे मैदान आहे, अशा स्थितीत लिलाव करणे अशक्य आहे. त्यामुळे पर्यायी जागा देईपर्यंत आठवडीबाजारातील दुकाने हटवू नये, अशी भूमिका ठोक भाजी विक्रेत्यांनी घेतली आहे. तर दुसरीकडे अतिक्रमण हटाव पथकाने सोमवारपासून दुकाने काढण्याची तयारी केली आहे. (शहर वार्ताहर)
टीएमसी प्रकल्पात ‘नो एन्ट्री’
ठोक भाजी विक्रेत्यांना विठ्ठलवाडी परिसरात खुली जागा देणे प्रस्तावित केले आहे. मात्र त्याठिकाणी कोणत्याही सुविधा नाही. या जागेलगतच कृषी उत्पन्न बाजार समितीचा टीएमसी प्रोजेक्ट आहे. त्यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहे. या ठिकाणी भाजी बाजाराचा लिलाव करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ठोक विक्रेत्यांनी केली आहे. परंतु सहकार विभागाच्या प्रभारी जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवी यांनी त्याला नकार दिला आहे. हा प्रकल्प कापसाकरिता असल्याने भाजी विक्रीला देता येणार नसल्याचे सांगितले.