मुस्लीम बांधवांनी पुकारलेल्या बंदला पुसदमध्ये गालबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 06:39 PM2021-11-12T18:39:19+5:302021-11-12T18:42:29+5:30

शिवाजी चौकातील मशिदीमध्ये दुपारच्या नमाजनंतर सुभाष चौकाकडे निघालेल्या जथ्याने जिल्हा बँक व जिनिंग- प्रेसिंग कॉम्प्लेक्समधील दुकानांवर दगडफेक करून व्यावसायिकांना मारहाण केली.

stone pelting in pusad while protesting for tripura incident | मुस्लीम बांधवांनी पुकारलेल्या बंदला पुसदमध्ये गालबोट

मुस्लीम बांधवांनी पुकारलेल्या बंदला पुसदमध्ये गालबोट

Next

यवतमाळ : त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ मुस्लीम बांधवांनी शुक्रवारी पुकारलेल्या बंदला येथे गालबोट लागले. शिवाजी चौकातील मशिदीमध्ये दुपारच्या नमाजनंतर सुभाष चौकाकडे निघालेल्या जथ्याने जिल्हा बँक व जिनिंग- प्रेसिंग कॉम्प्लेक्समधील दुकानांवर दगडफेक करून व्यावसायिकांना मारहाण केली.

देवश्री इलेक्ट्रॉनिक्सचे मालक अतुल व्यवहारे यांना जमावाने बेदम मारहाण करून त्यांचा मोबाइल व दुकानातील सामान हिसकले. पूजा हार्डवेअर दुकानातून पंखे उचलून नेले. एका चॅनलचे ऋषिकेश जोगदंडे यांनाही मारहाण करून त्यांचा कॅमेरा हिसकावून घेतला. कोणतीही परवानगी न घेता हा जुलूस काढल्याने पोलीस बंदोबस्त नव्हता.

घटनेचे वृत्त समजताच बाजारपेठेत धावपळ उडून दुकाने बंद झाली. दरम्यान, शहरचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांनी शहरात बंदोबस्त वाढवला. आमदार ॲड. निलय नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, चेंबर ऑफ कॉमर्सचे सूरज डुब्बेवार आदींनी पोलीस ठाणे गाठले. बंदला लागलेल्या गालबोटामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

पाेलीस अधीक्षकांची भेट

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी घटनेची माहिती मिळताच पोलिसांना विविध सूचना दिल्या. सायंकाळी त्यांनी शहराला भेट देऊन माहिती जाणून घेतली. या घटनेने शहरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी गस्त वाढविली आहे.

ढाणकी येथे मूक मोर्चा

उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे मुस्लीम बांधवांनी मूक मोर्चा काढला. प्रथम सर्व जण जामा मशीद येथे गोळा झाले. तेथून शांतीच्या मार्गाने मूक मोर्चा मुख्य बाजारात आला. मोर्चेकऱ्यांनी पोलीस चौकीत बिटरगावचे ठाणेदार प्रताप बोस यांना निवेदन दिले.

उमरखेडमध्ये धरणे आंदोलन

उमरखेड येथे समाजबांधवांनी एकत्रितपणे तहसील कार्यालयापुढे धरणे आंदोलन केले. नंतर उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांना निवेदन दिले. या धरणे आंदोलनामध्ये शहरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: stone pelting in pusad while protesting for tripura incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.