कोरोना नियंत्रणाचे सल्ले थांबवा, प्रत्यक्ष कृतीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 05:00 AM2021-05-06T05:00:00+5:302021-05-06T05:00:02+5:30
जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा दर हा १३.७ वर पोहोचला आहे. हा दर सर्वांसाठीच घातक आहे. अशाच पद्धतीने कोरोना पसरत राहिल्यास प्रत्येक व्यक्तीला याची बाधा झाल्याशिवाय राहणार नाही. सुमारे सव्वा वर्षांपासून कोविड योद्धा म्हणून सतत राबणारी आरोग्य यंत्रणा पुरती थकली आहे. कोरोना असाच वाढत राहिल्यास लगतच्या भविष्यात ती पूर्णत: कोलमडण्याची चिन्हे आहेत. कोरोनाची तपासणी वेळेत केली, तर त्यावर घरीच उपचार घेऊन नियंत्रण मिळविता येते.
सुरेंद्र राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मागील सव्वा वर्षापासून कोरोना नियंत्रणाच्या विविध बाबींवर सल्ले दिले जात आहे. प्रशासकीय यंत्रणेने कुठल्या पद्धतीने संसर्ग थांबविता येतो याचा परिपाठ दिला. आता तो पूर्णपणे आत्मसात करून राबविण्याची वेळ आली आहे. शासकीय यंत्रणा प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही. कुटुंब प्रमुख म्हणून प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वत:च कार्यकर्ता बनून काम करण्याची वेळ आली आहे. आता कोरोना नियंत्रणाचे सल्ले थांबवून प्रत्यक्ष कृती हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे.
जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा दर हा १३.७ वर पोहोचला आहे. हा दर सर्वांसाठीच घातक आहे. अशाच पद्धतीने कोरोना पसरत राहिल्यास प्रत्येक व्यक्तीला याची बाधा झाल्याशिवाय राहणार नाही. सुमारे सव्वा वर्षांपासून कोविड योद्धा म्हणून सतत राबणारी आरोग्य यंत्रणा पुरती थकली आहे. कोरोना असाच वाढत राहिल्यास लगतच्या भविष्यात ती पूर्णत: कोलमडण्याची चिन्हे आहेत. कोरोनाची तपासणी वेळेत केली, तर त्यावर घरीच उपचार घेऊन नियंत्रण मिळविता येते. त्याहीपेक्षा समाजात सार्वजनिक ठिकाणी वावरणे काही दिवस बंद करावे, स्वत: त्रिसूत्रीचे पालन करावे, मास्क, सॅनिटायझर व शारीरिक अंतर या आधारावरच कोरोनाचा फैलाव थांबवता येऊ शकतो. शासनाने ‘ब्रेक द चेन अगेन’ हे अभियान हाती घेतले. त्यासाठी बाजारपेठेवर, प्रवासावर निर्बंध घातले आहे. त्यानंतरही सामान्य नागरिक जुमानताना दिसत नाही. यवतमाळातील बाजारपेठेत सकाळी ७ ते ११ या वेळेत प्रचंड गर्दी पाहायला मिळते. दररोज ठोक किराणा लाइनमध्ये पाय ठेवायला जागा नसते. एकीकडे जीवनमरणाची लढाई सुरू असताना दुसरीकडे बेजबाबदारपणे हिंडणारे पाहून भीती आणखीच वाढत आहे.
प्रत्येकाने आपण समाजाचे दायित्व देणे लागतो, ही भावना बाळगणे गरजेचे आहे. त्याहीपेक्षा स्वार्थी विचार करीत किमान स्वत:चे कुटुंब व आपण स्वत: या महामारीत सुरक्षित राहू, यासाठी तरी दक्षता बाळगणे अपेक्षित आहे.
दुर्दैवाने प्रशासनाचे निर्बंध कुणीच पाळताना दिसत नाही. वारंवार जाणीव-जागृती, कारवाई या माध्यमातून गर्दी नियंत्रणाचा व कोविड उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला प्रतिसाद मात्र मिळताना दिसत नाही.
प्रत्येक वाॅर्डात, गल्ली, मोहोल्यात व्हावी जनजागृती आणि मदतीची चळवळ
कोरोना आजारासंदर्भात आजही प्रत्येकाची वेगवेगळी मतमतांतरे आहे. दुसरीकडे खासगी व सरकारी रुग्णालये रुग्णांनी भरलेली आहे. इतकेच काय स्मशानातही मृतदेहांची गर्दी वाढत आहे. हे चित्र पाहून आपली मतमतांतरे काही काळ बाजूला ठेवून एकदिलाने काम करण्याची गरज आहे. प्रत्येक वॉर्ड, गल्ली, मोहल्ला येथे विनामास्क फिरणारा दिसला, तर त्याला मास्क लावण्यासाठी बाध्य करावे. कुठलीही आजाराची लक्षणे असल्यास तत्काळ तपासणी करण्यास सांगावे. मदतीचा हात घेऊन प्रत्येक जण जवळ आल्यास खऱ्या अर्थाने कोरोना नियंत्रणाची चळवळ उभारता येणार आहे. आता केवळ सल्ला न देता प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. सर्व क्षेत्रातील कार्यकर्ते, संघटनांनी एकत्र येऊन प्रत्येक वाॅर्डात जणू दत्तक घेतल्यागत जनजागृती व मदत करणे अपेक्षित आहे. प्रत्येक गल्लीसाठी दोन-पाच कार्यकर्त्यांची नेमणूक करून त्यांच्यावर जनजागृती व मदतीची जबाबदारी सोपविता येणे शक्य आहे. या माध्यमातून सूक्ष्म पद्धतीने घराघरापर्यंत पोहोचून कोरोना प्रतिबंधक पंचसूत्रीची अंमलबजावणी करणे आता काहीच कठीण नाही.
उणिवा शोधणे थांबवून वैयक्तिक योगदानावर हवा भर
प्रशासकीय यंत्रणा, अधिकाऱ्यांचे निर्णय किती चूक किती बरोबर यावर चर्चा करण्यापेक्षा वैयक्तिक योगदान किती हे महत्वाचे ठरणार आहे. नेमके काय करायला हवे, काय नको हे प्रत्येकाला चांगल्या पद्धतीने ठावूक आहे. वैयक्तिक योगदान म्हणजे काय तर स्वत:सह आपल्या कुटुंबाची सुरक्षितता सांभाळणे हे आहे. आपल्यापासून दुसऱ्याला फैलाव होणार नाही ही खबरदारी कोरोना नियंत्रणात योगदान ठरू शकते. या सध्या पण तितक्याच महत्वपूर्ण बाबींकडे महामारीच्या काळात दुर्लक्ष करणे घातक ठरणारे आहे. हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळेच ‘लोकमत’ने निदर्शनास आलेल्या बाबी समाजापुढे मांडून प्रत्येकाला महामारी नियंत्रणासाठी एक पाऊल पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
बेडसाठी धडपडणाऱ्यांची व्यथा समजून घ्या
आपल्या कुटुंबातील सदस्याची प्रकृती गंभीर आहे, त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी बेड मिळत नाही, बेड मिळाला तर योग्य औषधी नाही, आर्थिक परिस्थिती नसताना उपचार खर्चाची जुळवाजुळव केली जात आहे. ज्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता आहे, अशाही कुटुंबात चार-चार सदस्यांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मोकाट फिरणाऱ्यांनी अशांची व्यथा समजून घराबाहेर पडणे टाळावे, तरच स्थिती नियंत्रणात येऊ शकते.