गौळ-आसोली नळयोजना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 10:25 PM2018-03-29T22:25:03+5:302018-03-29T22:25:03+5:30
तालुक्यातील गौळ आसोली पाणीपुरवठा योजना प्रशासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे अनेक वर्षांपासून बंद पडली आहे.
अखिलेश अग्रवाल ।
ऑनलाईन लोकमत
पुसद : तालुक्यातील गौळ आसोली पाणीपुरवठा योजना प्रशासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे अनेक वर्षांपासून बंद पडली आहे. परिणामी यंदाच्या भीषण पाणीटंचाई काळात दहा गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येत्या १५ दिवसात पाणीपुरवठा सुरू केला नाही तर आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
पुसद तालुक्यातील गौळ आसोली येथे पाच कोटी ६२ लाख रुपये खर्च करून जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात आले होते. याचा फायदा हर्षी, गौळ, आसोली, दहीवड, पाळूवाडी, वेणी, खडकदरी, लोणदरी, शिवाजीनगर, शिळोणा या गावातील नागरिकांना होत होता. ही योजना जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीची आहे. योजना नियमित सुरू ठेवण्यासाठी वार्षिक खर्च ४५ लाखांपेक्षा अधिक आहे. तेव्हा ही योजना सुरू करण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणा घेत नसल्याने अनेक वर्षांपासून दहा गावची पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. ही योजना पुनश्च सुरू करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता एस.एम. दारव्हेकर यांनी आमदार व खासदारांशी चर्चा केली. पाणीटंचाईची माहिती दिली. परंतु लोकप्रतिनिधींची अनास्था दिसून आली. त्यामुळे या दहा गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
मार्च महिन्यात पारा ३८ अंशांपेक्षा अधिक झाला आहे. पहाटे ५ वाजल्यापासून नागरिकांना पाण्याच्या शोधार्थ भटकावे लागते. घरी पाणी आणण्यासाठी नागरिक भल्या पहाटेच घराबाहेर पडतात. त्यामुळे मोलमजुरी बुडत आहे. पुसद तालुक्यावर दुष्काळाचे सावट असून फेब्रुवारी महिन्यापासूनच पिण्याचे पाणी व जनावरांसाठी पाणी उपलब्ध नाही.
या प्रकल्पाला दहा गावे जोडली आहे. आसोली गावात गोपाळकृष्ण गोशाळा आहे. या गोशाळेत १५० जनावरे असून त्यांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे, अशी माहिती गोशाळेचे संचालक अनिल पांडे यांनी दिली. एक दिवसाआड जनावरांसाठी पाण्यावर ७०० रुपये खर्च करावे लागत आहे.
२३ हजार नागरिक तहानलेले
गौळ-आसोली पाणीपुरवठा योजनेंतर्गत दहा गावांची लोकसंख्या २३ हजार आहे. ही योजना बंद असल्याने पिण्यासाठी पाणी मिळत नाही. जनावरांनाही भटकंती करावी लागते. पाण्यासाठी जनता व्याकुळ झाली असून १५ दिवसांत पाणीपुरवठा झाला नाही तर रस्ता रोको आंदोलनाचा इशारा अनिल दत्तराव पांडे यांनी दिला आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.