अवैध धंदे बंद करा, अन्यथा निलंबन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 09:37 PM2019-01-22T21:37:30+5:302019-01-22T21:38:11+5:30
राज्यमंत्री दर्जाच्या किशोर तिवारी यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या मटका-जुगाराची पोलखोल केल्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. अवैध धंदे तातडीने बंद करा अन्यथा निलंबन कारवाईला सामोरे जा, असा इशाराच जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्यमंत्री दर्जाच्या किशोर तिवारी यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या मटका-जुगाराची पोलखोल केल्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. अवैध धंदे तातडीने बंद करा अन्यथा निलंबन कारवाईला सामोरे जा, असा इशाराच जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी दिला.
जिल्ह्यातील ठाणेदारांची क्राईम मिटींग मंगळवारी मुख्यालयात पार पडली. या बैठकीवर जिल्हा पोलीस दलाच्या बेअब्रूच्या मालिकेचे सावट होते. तमाम अवैध धंदे तत्काळ बंद करा, यापुढे धंदे सुरू असल्याची बातमी आली तरी कारवाई केली जाईल, असा गर्भित इशारा राज कुमार यांनी दिला. पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी नुकतीच नागपुरात राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सूचना दिल्या. त्या सूचनांची माहिती एसपींनी बैठकीत ठाणेदारांना दिली. निवडणुकीत दारू सामाजिक शांततेचे गणित बिघडविते. त्यामुळे गावठी दारू काढणाºया गावांवर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश देण्यात आले. आमच्या गावात गावठी दारू काढली जाते अशा स्वरूपाच्या तक्रारी नेहमीच महिला वर्गाकडून महासंचालक कार्यालय आणि गृहमंत्र्यांपर्यंत पाठविल्या जातात. या तक्रारी होऊ नये म्हणून अवैध दारूचे गुत्ते उद्ध्वस्त करण्याचे निर्देश देण्यात आले.
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी क्रियाशील गुन्हेगारांवर वॉच ठेवण्याचे, प्रतिबंधात्मक कारवाई वाढविण्याचे व तडीपारीच्या कारवाईवर भर देण्याचे निर्देश ठाणेदारांना देण्यात आले.
या बैठकीमध्ये गुन्हेगारी, डिटेक्शन, गुन्हे शाबितीचे प्रमाण, शिक्षेचा दर वाढविण्यासाठी करावयाचे जाणीवपूर्वक प्रयत्न, तस्करी, शस्त्रे, अंमलीपदार्थ रोखणे, वाहतूक व्यवस्था, समन्स वॉरंटची तामिली यावरही आढावा घेतला गेला. सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, त्यासाठी करावयाच्या आवश्यक उपाययोजना हाती घ्याव्या, असे निर्देश एसपींनी दिले.
तरुणीच्या ‘ईन-कॅमेरा’ बयानाने वणीच्या अधिकाऱ्याचे कारनामे रेकॉर्डवर
वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी एका तरुणीविरोधात घरापुढे गोंधळ घालणे, मोबाईल हिसकणे, दहा लाखांची खंडणी मागणे अशा स्वरूपाची तक्रार पोलिसात दिली. त्यावरून गुन्हेही नोंदविले गेले. परंतु हे ‘उभे केलेले’ प्रकरण त्यांच्यावरच शेकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अमरावतीच्या महानिरीक्षकांच्या सूचनेवरून या गुन्ह्याचा तपास पांढरकवडाचे एसडीपीओ अमोल कोळी यांच्याकडे देण्यात आला. कोळी यांनी त्या तरुणीचे ‘ईन-कॅमेरा’ बयान नोंदविले. या बयानात तरुणीने ठाणेदार व त्यांच्या साथीदारांचे एकूणच ‘कारनामे’ उघड केले. शिवाय कोठून-कुठे कसा प्रवास झाला, कुठे मुक्काम झाला याचीही पोलखोल केली. त्यामुळे या प्रकरणात ‘काऊंटर’ आणि गंभीरस्वरूपाचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पोलीस अधीक्षकांना निलंबनाचा आणखी एक आदेश जारी करावा लागू शकतो. गेल्या दोन आठवड्यात तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काढण्याची नामुष्की पोलीस प्रशासनावर आली असून कदाचित चौथ्यांदासुद्धा ही वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.