दारव्हा नाक्यावर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:00 AM2018-05-12T00:00:53+5:302018-05-12T00:00:53+5:30
दर्डानगर पाणी टाकीवरून दीड महिन्यांपासून पाणीपुरवठा न झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी दारव्हा नाक्यावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता रस्ता रोको केला. तब्बल दीड तास वाहतूक रोखून धरली. जीवन प्राधिकरणाने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दर्डानगर पाणी टाकीवरून दीड महिन्यांपासून पाणीपुरवठा न झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी दारव्हा नाक्यावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता रस्ता रोको केला. तब्बल दीड तास वाहतूक रोखून धरली. जीवन प्राधिकरणाने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शहरात पाणी टंचाईने उग्र रुप धारण केले असून प्रभाग क्र. २५ मधील संतप्त नागरिकांचा आज रुद्रावतार पहावयास मिळाला. दारव्हा नाक्यावर महिला व पुरुषांसह शेकडो नागरिकांनी हातात मडके घेऊन ठिय्या दिला. नगरसेवक पंकज मुंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ऐन कार्यालयीन वेळेच्या प्रारंभी आंदोलन सुरू झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. मार्ग वळवून दुसऱ्या मार्गाने वाहने जात होती. प्रशासनाला कोणतीच माहिती नसल्याने एकच तारांबळ उडाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. नळ कधी येणार हे सांगितल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतली.
शनिवारी पाणीपुरवठा
यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जीवन प्राधिकरणाचे अधिकारी व आंदोलन करणारे नगरसेवक पंकज मुंदे यांना पाचारण करण्यात आले. त्या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, एसडीओ स्वप्नील तांगडे यांच्यासोबत चर्चा झाली. त्यावेळी शनिवारी दुपारी १२ वाजतानंतर या परिसरात नळाचे पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.