लोणी येथे शेतकºयांचा रस्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 10:59 PM2017-10-25T22:59:12+5:302017-10-25T22:59:22+5:30
भारनियमनामुळे रात्री ओलित करण्याची वेळ आर्णी तालुक्यातील शेतकºयांवर आली आहे. रोहित्रातील विजेच्या धक्क्याने तालुक्यातील लोणी येथे एका शेतकºयाचा मृत्यू झाल्याने बुधवारी शेतकºयांच्या संयमाचा बांध फुटला.
आर्णी : भारनियमनामुळे रात्री ओलित करण्याची वेळ आर्णी तालुक्यातील शेतकºयांवर आली आहे. रोहित्रातील विजेच्या धक्क्याने तालुक्यातील लोणी येथे एका शेतकºयाचा मृत्यू झाल्याने बुधवारी शेतकºयांच्या संयमाचा बांध फुटला. आर्णी-दारव्हा मार्गावर लोणी येथे शेतकºयांनी रस्ता रोको करून वीज वितरण कंपनीविरुद्ध आपला रोष व्यक्त केला. रस्त्यावर टायर पेटवून तब्बल तीन तास वाहतूक रोखून धरली होती.
आर्णी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू आहे. त्यातही भारनियमन दिवसा केले जात असल्याने शेतकºयांना रात्रीच ओलितासाठी जावे लागते. यामुळे शेतकºयांमध्ये असंतोष खदखदत आहे. लोणी येथील शेतकरी संतोष विष्णू होळकर (३०) याचा रोहित्रातील विजेच्या धक्क्याने बुधवारी सकाळी मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. यामुळे गावकरी संतापले. थेट लोणीच्या बसस्थानकावर येऊन दुपारी १२ वाजता चक्काजाम सुरू केला. रस्त्यावर मोठ्ठाले टायर पेटवून वाहतूक रोखून धरली. वीज वितरण कंपनीविरुद्ध शेतकरी रोष व्यक्त करीत होते. चक्काजामची माहिती आर्णी पोलिसांना होताच त्यांनी तत्काळ लोणी गाठले. तसेच वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता चेतना मोहनकर, नायब तहसीलदार आर.बी. मांडेकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. संतप्त शेतकºयांशी चर्चा केली. लेखी आश्वासन दिल्यानंतर दुपारी ३ वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शेतकºयांनी लोणी येथील वीज कर्मचारी उर्मट वागणूक देत असल्याचा आरोप केला.
रोहित्रातील विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार
संतोष विष्णू होळकर याच्याकडे चार एकर शेती होती. त्याच्यावरच संपूर्ण कुटुंबाची भिस्त होती. यावर्षी त्याने आपल्या शेतात कापूस, सोयाबीन आणि हरभरा लावला होता. दिवसा भारनियमन होत असल्याने तो दररोज रात्री ओलित करण्यासाठी शेतात जात होता. शेतातील बोअरवेलवरून तो ओलित करीत होता. बोअरवेलला पाणी कमी असल्याने केवळ दोन नोझलवरच तो सिंचन करीत होता. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे दुचाकीने तो गणगाव मार्गावरील शेतात गेला. रात्री त्याच्या वडिलांनी मोबाईल लावला परंतु प्रतिसाद मिळत नव्हता. कामात असेल म्हणून वडिलांनी याकडे दुर्लक्ष केले. सकाळी ९ वाजले तरी संतोष घरी आला नाही म्हणून वडिलांनी शेत गाठले. शेतातही तो दिसत नव्हता. मात्र त्याची दुचाकी धुºयावर उभी होती. त्याचा शोध घेतला असता शेतातील रोहित्राजवळ (डीपी) त्याचा मृतदेह आढळून आला. मुलाचा मृतदेह पाहताच त्यांनी हंबरडा फोडला. ही माहिती गावात होताच गावकºयांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. संतोषच्या मागे पत्नी, मुलगी, वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.