पुसद येथे पाण्यासाठी रस्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 10:06 PM2017-11-21T22:06:04+5:302017-11-21T22:07:05+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पूस धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने शहराच्या विविध भागात पाणी समस्या निर्माण झाली असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्डात तर पाणी पेटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पूस धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने शहराच्या विविध भागात पाणी समस्या निर्माण झाली असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्डात तर पाणी पेटले आहे. या भागातील संतप्त नागरिकांनी मंगळवारी उमरखेड मार्गावर रस्ता रोको आंदोलन केले.
पुसद शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. या वार्डात अतिशय जुनी व लहान पाईपलाईन आहे. त्यामुळे वार्डात पाणीपुरवठा होत नाही. नवीन व मोठी पाईपलाईन टाकण्याच्या मागणीसाठी रस्ता रोको करण्यात आले. या परिसरातील शेकडो स्त्री व पुरुषांनी उमरखेड मार्गावर पाण्याच्या हंड्यासह ठिय्या दिला. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. घटनास्थळी पोलीसही दाखल झाले. मात्र आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम होते. अखेर पाणीपुरवठा सभापती राजू दुधे आंदोलन स्थळी आले. त्यांनी नवीन पाईपलाईन टाकून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी भीम टायगर सेनेचे अध्यक्ष किशोर कांबळे, भीम शक्ती संघटनेचे सुरज हाडसे व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
तीन दिवसाआड पाणी
पुसद शहरासाठी जीवनदायी असलेल्या पूस धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे नगरपरिषदेने शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यातच नगरपरिषदेचे योग्य नियोजन नसल्याने अनेक भागात नागरिकांना पाणीच मिळत नाही.