तूर खरेदीसाठी आर्णी येथे रास्ता रोको
By admin | Published: March 18, 2017 12:43 AM2017-03-18T00:43:23+5:302017-03-18T00:43:23+5:30
ढगाळ वातावरण आणि बारदाना उपलब्ध नसल्याचे कारण देत बंद असलेली एफसीआयची तूर खरेदी पूर्ववत सुरू करावी,
काँग्रेस, प्रहारचे आंदोलन : टायर जाळले, नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग एक तास ठप्प
आर्णी : ढगाळ वातावरण आणि बारदाना उपलब्ध नसल्याचे कारण देत बंद असलेली एफसीआयची तूर खरेदी पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी आर्णी येथे संतप्त शेतकऱ्यांनी काँग्रेस व प्रहारच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी चक्काजाम केला. रस्त्यावर टायर पेटविल्याने नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात एफसीआयची तूर खरेदी सुरू आहे. परंतु दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि बारदाना संपल्याचे सांगत ही तूर खरेदी बंद करण्यात आली. तसेच गुरुवारी आलेल्या पावसाने उघड्यावरील तुरी ओल्या झाल्या. यामुळे शेतकरी संतप्त होते. दरम्यान, शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता बाजार समितीच्या नवीन यार्डासमोर काँग्रेस व प्रहारच्यावतीने टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे अनिल आडे, राजू बुटले, परशराम राठोड, सुनील भारती, खुशाल ठाकरे, प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद कुदळे, आकाश राठोड, प्रवीण देशमुख, सचिन अगलदरे, अतुल मुनगिनवार आदी उपस्थित होते. तब्बल तासभर केलेल्या आंदोलनाने वाहतूक ठप्प झाली होती.
तहसीलदार सुधीर पवार, सहायक निबंधक सुरेश अंबिलपुरे, आर्णी बाजार समितीचे सचिव विशाल राठोड, एफसीआयचे विजय भालारकर, आर्णीचे पोलीस उपनिरीक्षक सचिन वळवी, राजकुमार मडावी, गणेश हिरूळकर आदींनी मध्यस्थी केली. शेवटी एफसीआयने तूर खरेदी सुरू केली. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)