आर्णी-दारव्हा रोडवर रास्ता रोको

By admin | Published: November 13, 2015 02:16 AM2015-11-13T02:16:46+5:302015-11-13T02:16:46+5:30

वीज कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये ऐन दिवाळीच्या दिवशी अंधार पसरला होता.

Stop the route on Arni-Darwha Road | आर्णी-दारव्हा रोडवर रास्ता रोको

आर्णी-दारव्हा रोडवर रास्ता रोको

Next

ऐन दिवाळीत अंधार : लोणी वीज कार्यालयापुढे शेतकरी आक्रमक
आर्णी : वीज कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये ऐन दिवाळीच्या दिवशी अंधार पसरला होता. त्यामुळे आर्णी-दारव्हा रोडवर तब्बल तीन तास शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
लोणी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आजूबाजूच्या अनेक गावातील शेतकरी गोळा झाले. आक्रमकपणे घोषणा देत तब्बल तीन तास आर्णी ते दारव्हा मार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली होती. विद्युत वितरण कंपनीच्या नियोजनशून्यतेमुळे या भागातील नागरिकांना काळोखातच दिवाळी साजरी करावी लागली. शेतीतील कामे करतानाही शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीज मिळत नाही. जी काही वीज पुरविली जाते तीही पुरेशा दाबाने मिळत नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष खदखदत आहे.
विद्युत विभागाकडून दुरुस्तीची कामेही वेळेवर होत नाही. त्यामुळे बुधवारी ऐन दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामध्ये लोणीसह बेलोरा, रूई, महागाव, शिवणी, देवगाव या भागातील शेतकरी सहभागी झाले होते. या दरम्यान, आर्णी येथील सहायक अभियंता भास्करवार व ठाणेदार यांनी आंदोलकांशी चर्चा केली. विद्युत विभागाकडून यापुढे हयगय होणार नाही, असे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात ओंकार खारोळ, बाळासाहेब गायधने, राम होले, गुणवंत यादव, संतोष कोषटवार, दत्ता सोळंके, दिलीप पवार, अमोल ठाकरे, विनोद रामटेके, दीपक बोडे आदींनी सहभाग घेतला होता. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Stop the route on Arni-Darwha Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.