सत्यजितच्या यशात आर्थिक अडचणींचा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 09:50 PM2019-05-31T21:50:45+5:302019-05-31T21:51:16+5:30
बारावीच्या परीक्षेत तालुक्यात अव्वल आलेल्या सत्यजित हिरोडे याच्यासमोर पुढील शिक्षणाचे आवहान उभे ठाकले आहे. त्याच्या यशात आता आर्थिक अडचणींचा अडथळा येत असल्याने बेताची परिस्थिती असलेले पालक भांबावून गेले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : बारावीच्या परीक्षेत तालुक्यात अव्वल आलेल्या सत्यजित हिरोडे याच्यासमोर पुढील शिक्षणाचे आवहान उभे ठाकले आहे. त्याच्या यशात आता आर्थिक अडचणींचा अडथळा येत असल्याने बेताची परिस्थिती असलेले पालक भांबावून गेले आहे.
बारावीच्या परीक्षेत येथील सत्यजित हिरोडे याने तालुक्यातून पहिला क्रमांक पटकाविला. त्याचे पालक रोजमजुरी करतात. हिरोडे दाम्पत्याने मोठया कष्टाने सत्यजितला शिक्षण दिले. त्यानेही आई, बाबांचे नाव काढत पहिला क्रमांक प्राप्त केला. सत्यजितने बारावी विज्ञान शाखेत ९0.७६ टक्के गुण प्राप्त केले. त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली. मात्र आता तो व त्याच्या पालकांपुढे पुढील शिक्षणाचे आव्हान उभे ठाकले
आहे.
अनेक विद्यार्थी विज्ञान शाखेचे शिक्षण घेण्यासाठी मोठ्या शहराकडे धाव घेतात. अनेक विद्यार्थी महागडे कोचींग क्लासेस लावतात. मात्र मुळातच जर टॅलेंट असले, तर हिरा कुठेही चमकतो.
सत्यजितने आर्णीत राहून येथीलच देवराव पाटील शिंदे कॉलेजमधून आपली गुणवत्ता सिद्ध केली. घरची परिस्थिती बेताची असल्याने अनेक शिक्षकांनी त्याला मदत केली. कुणी शिकवणीचे अत्यंत कमी पैसे घेतले, तर कुणी त्याला मोफत शिक्षण दिले. पल्लवी चव्हाण नामक मुलीने त्याला मोफत बारावीची पुस्तके उपलब्ध करून दिली. या सर्वांच्या सहकार्यामुळेच आपण यश प्राप्त केल्याचे सत्यजितने नम्रपणे सांगितले.
दोनच खोल्यांचे घर. त्यात आजारी आजी-आजोबा, आई, वडील, बहीण, असे त्याचे कुटुंब. याच घरात त्याने दररोज पाच तास अभ्यास केला. दहावीतसुद्धा सत्यजितने ९२ टक्के गुण घेतले होते. त्याने शिष्यवृत्ती परीक्षेतही यश संपादन केले होते. घराची संपूर्ण जबाबदारी त्याचे वडील महादेवराव यांच्यावर आहे. ते धान्य बाजारात रोजंदारी मजूर म्हणून काम करतात. आई शेतात मजुरी करते. मात्र परिस्थिती आड येऊ न देता त्याने बारावीत यश प्राप्त केले.
डॉक्टरकीचे स्वप्न पूर्ण करण्यात आर्थिक अडसर
आता पुढे शिकून सत्यजितला डॉक्टर व्हायचे आहे. मात्र आर्थिक अडसर येत आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार, असा प्रश्न पडल्याने तो अबोल झाला. आत्तापर्यंत साजीद शेख, अरविंद भोयर, कलिम शेख, ताई करपे, संगिता ठाकरे आदींच्या मदत व प्रोत्साहनामुळे शिक्षण घेणे सोपे झाले, असे तो स्पष्ट करतो. अभ्यासात सातत्य, केवळ अभ्यासावरच फोकस ठेवला, तर प्रत्येक विद्यार्थी यश मिळवू शकतो. त्यासाठी महागडे कोचिंग लावणची गरज नाही. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, कठोर मेहनत आणि चिकाटीने अभ्यास केला, तर काहीच अशक्य नाही, असे सत्यजितने सांगितले.