सारस पक्ष्याने पोखरला तलाव, तरी सिंचन विभाग झोपेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 05:00 AM2021-09-26T05:00:00+5:302021-09-26T05:00:20+5:30

गेल्या ९ सप्टेंबरला तलावाची भिंत सारस पक्ष्याने पोखरल्याने गळती झाल्याची तक्रार गावकऱ्यांनी पुसद येथील सिंचन उपविभागाकडे केली होती. सिंचन विभागाने प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये माती भरून थातूरमातूर डागडुजी केली. मात्र मुख्य छिद्र बुजविले नाही. त्यामुळे हा अनर्थ घडल्याचे सरपंच पुरुषोत्तम कुडवे यांनी सांगितले. डागडुजीनंतर केवळ १५ दिवसांतच तलाव फुटल्याने त्याला सिंचन विभागच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

The stork bird pond pond, though the irrigation department sleeps | सारस पक्ष्याने पोखरला तलाव, तरी सिंचन विभाग झोपेत

सारस पक्ष्याने पोखरला तलाव, तरी सिंचन विभाग झोपेत

googlenewsNext

प्रकाश सातघरे
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : सिंचन उपविभागाच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील झिरपूरवाडी येथील पाझर तलाव शुक्रवारी फुटला.  हा तलाव काही महिन्यांपूर्वीच सारस पक्षांनी पोखरणे सुरू केल्याचे निरीक्षण शेतकऱ्यांनी नोंदविले होते. याबाबत सिंचन विभागाला लेखी सूचना देवूनही दुर्लक्ष केल्याने अखेर तलावच फुटला. तलावाच्या पाण्यामुळे अनेक शेतातील पिके वाहून गेली. शिवाय गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत गाळ साचला. 
गेल्या ९ सप्टेंबरला तलावाची भिंत सारस पक्ष्याने पोखरल्याने गळती झाल्याची तक्रार गावकऱ्यांनी पुसद येथील सिंचन उपविभागाकडे केली होती. सिंचन विभागाने प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये माती भरून थातूरमातूर डागडुजी केली. मात्र मुख्य छिद्र बुजविले नाही. त्यामुळे हा अनर्थ घडल्याचे सरपंच पुरुषोत्तम कुडवे यांनी सांगितले. डागडुजीनंतर केवळ १५ दिवसांतच तलाव फुटल्याने त्याला सिंचन विभागच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
झिरपूरवाडी येथे १९८४-८५ मध्ये लाखो रुपये खर्च करून पाझर तलाव बांधण्यात आला. या तलावातील पाण्यातून आजूबाजूच्या ५० ते ६० हेक्टर शेतीचे ओलित केले जात होते. जनावरांना पाण्याची साेय उपलब्ध झाली होती. तलावात बाराही महिने पाणी राहत होते. बुधवारी तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तलाव काठोकाठ भरला. पाण्याच्या दाबाने अखेर शुक्रवारी तलावाची भिंत फुटली. 
तलावातील पाण्यामुळे आजूबाजूच्या शेतातील कपाशी व सोयाबीनचे उभे पीक वाहून गेले. काही शेतांतील पीक आडवे झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. भविष्यातही सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला. केवळ सिंचन उपविभागाच्या हलगर्जीपणामुळे ही आपत्ती ओढवल्याचे झिरपूरवाडीचे सरपंच पुरुषोत्तम कुडवे यांनी सांगितले. प्रभारी तहसीलदार बन यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. 
झिरपूरवाडी परिसरात तलाव फुटल्याने पिकांचे नुकसान झाले. एवढी मोठी घटना घडल्यानंतरही सिंचन विभाग गाफील आहे. 

पाणीपुरवठ्याचे मोटारपंप गेले वाहून
- भिंत फुटून आलेल्या पुरामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या विहिरीवरील तीन मोटारपंप व इतर साहित्य वाहून गेले. त्यामुळे गावाचा पुरवठा ठप्प पडला आहे. विहिरीमध्ये संपूर्ण गाळ साचला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. 
तक्रारीनंतरही अभियंत्याचे दुर्लक्ष
- गावकऱ्यांनी तलाव पोखरल्याची तक्रार केली होती. मात्र डागडुजीनंतर तलाव फुटणार नाही, अशी ग्वाही पुसद येथील सिंचन उपविभागाच्या अभियंत्यांनी दिली होती. नंतर त्यांनी तलावाकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. गावकऱ्यांनी लेखी स्वरूपात तक्रार दिल्यानंतर अभियंत्यांनी तातडीने दखल घेतली असती तर कदाचित पाझर तलाव फुटण्याची वेळ आली नसती. 

 

Web Title: The stork bird pond pond, though the irrigation department sleeps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.