वादळात इसम २00 फूट उडाला
By admin | Published: June 4, 2014 12:21 AM2014-06-04T00:21:27+5:302014-06-04T00:21:27+5:30
प्रचंड वादळात घरावरील टिनपत्रे उडून जाऊ नये म्हणून घरावर चढून दगड ठेवताना चक्क टीनपत्र्यासह एक इसम २00 फूट उडून गेला. एका वीज खांबावर डोके आदळल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला.
चातारीची घटना : घरावरील टिनपत्रे उडू नये म्हणून दगड ठेवत होता
उमरखेड (कुपटी) : प्रचंड वादळात घरावरील टिनपत्रे उडून जाऊ नये म्हणून घरावर चढून दगड ठेवताना चक्क टीनपत्र्यासह एक इसम २00 फूट उडून गेला. एका वीज खांबावर डोके आदळल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना उमरखेड तालुक्यातील चातारी येथे सोमवारी सायंकाळी ५ वाजता घडली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
उमरखेड तालुक्यातील चातारी येथे सोमवारी प्रचंड वादळ झाले. अचानक आलेल्या वादळाने प्रत्येक जण सैरावैरा पळत होते. अनेकांनी घराचा आश्रय घेतला. घरावरील टीनपत्रे उडायला लागल्याने नागरिकांची घाबरगुंडी उडाली. त्यातच सैय्यद उस्मान सै.जमाल आपल्या घरात होते. टीनपत्रे उडून जाऊ नये म्हणून ते वादळातही घरावर चढले. टीनपत्र्यावर दगड ठेवत होते. मात्र वादळाने त्यांच्या घरावरील टीनपत्रे क्षणाधार्त उडाली. टीनपत्र्यावर असलेले सैय्यद उस्मानही त्याच्यसोबत उडून गेले. सुमारे २00 फूट उडून जाऊन एका वीज खांबावर त्यांचे डोके आदळले. गावात वादळी वातावरण असल्याने घराबाहेर कुणीही नव्हते. जखमी अवस्थेत सय्यद उस्मान यांचा जागीच मृत्यू झाला. ते घरातील कर्ते पुरुष असून त्यांच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबच उघड्यावर आले आहे. (वार्ताहर)