वादळाने सहा वीज टॉवर कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 11:48 PM2018-06-19T23:48:32+5:302018-06-19T23:48:32+5:30
वादळामुळे अतिउच्चदाब वीज वाहिनीचे सहा टॉवर मंगळवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास कोसळले. यामुळे आसेगाव-मांगूळ-मांगलादेवी मार्गावरील शेती पिकाचे नुकसान झाले.
सुरज नौकरकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगावदेवी : वादळामुळे अतिउच्चदाब वीज वाहिनीचे सहा टॉवर मंगळवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास कोसळले. यामुळे आसेगाव-मांगूळ-मांगलादेवी मार्गावरील शेती पिकाचे नुकसान झाले. वीज तारा रस्त्यावर पडून असल्याने भीतीपोटी या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. शिवाय परिसरातील काही गावांमध्ये झाडे कोसळली.
या भागातून देवळी येथून निघालेली उच्चदाब वीज वाहिनी गेली आहे. शेतातूनच या वाहिनीचा मार्ग आहे. काही टॉवर जमीनदोस्त झाले. तर काही वाकले आहे. या टॉवरवरील संपूर्ण तारा शेतात पडलेल्या आहेत. अतिउच्च दाबाची वीज वाहिनी असल्याने नागरिकांमध्ये मोठी भीती आहे. त्यामुळे तारा आणि टॉवर पडून असलेल्या शेतात जाण्यासही शेतकरी धजावत नाही. शेती कामाचे दिवस असताना त्यांच्यापुढे हे नवीन संकट उभे ठाकले आहे.
कोसळलेल्या टॉवरवरील वीज वाहिनी ११०० केव्हीची असल्याचे सांगितले जाते. या भागातून तीन वीज वाहिन्या गेल्या आहेत. जोरदार वाऱ्यामुळे टॉवर कोसळण्याचा प्रकार घडला आहे. शिवाय या परिसरातील काही भागात झाडे उन्मळून पडली आहे. अनेकांच्या घराचेही नुकसान झाल्याचे सांगितले जाते. जोरदार वाऱ्यामुळे शेतातील मजुरांमध्येही भीती निर्माण झाली होती.
घर कोसळून एक ठार
आलेगाव येथे घर कोसळून एक जण ठार तर तीन जण जखमी झाले. सुधीर किसन राठोड (३५) असे मृताचे नाव आहे. घराच्या सज्याखाली दबून त्यांचा मृत्यू झाला. सायंकाळी झालेल्या चक्रीवादळामुळे घर कोसळल्याने ही घटना घडली. या गावातील बहुतांश झाडे जमीनदोस्त झाली.