जिल्हा बॅंकेतील बंडाचे वादळ विरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 05:00 AM2021-06-02T05:00:00+5:302021-06-02T05:00:22+5:30
जिल्हा बॅंकेतील पदभरती हा नव्या-जुन्या संचालकांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय. यात पूर्वीच मोठी उलाढाल झाली आहे. त्यात नव्यांच्या हाती काही येत नसल्याने कुजबुज सुरू झाली होती. विद्यमान अध्यक्षाच्या पारदर्शक कारभाराचाही काहींनी धसका घेतला होता. त्यामुळे दबाव तंत्राकरिता स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. १५ संचालकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. या घडामोडींवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांचे लक्ष होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या आघाडीची सत्ता आहे. मात्र जेमतेम तीन महिन्याच्या वाटचालीतच अंतर्गत धुसफूस सुरू झाली. स्वीकृत संचालक नेमण्यावरून मोर्चेबांधणी करण्यात येऊ लागली. बंडाची रणनीतीही तयार झाली. मात्र या पक्षातील मातब्बर नेत्यांनी एकाच वेळी निर्णायक खेळी करून सध्या तरी हे बंडाचे वादळ शमविले आहे. ४ जून रोजी बॅंक संचालकांची बैठक होत असून, त्यामध्ये तीन विषय मंजुरीला ठेवण्यात आले आहे.
जिल्हा बॅंकेतील पदभरती हा नव्या-जुन्या संचालकांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय. यात पूर्वीच मोठी उलाढाल झाली आहे. त्यात नव्यांच्या हाती काही येत नसल्याने कुजबुज सुरू झाली होती. विद्यमान अध्यक्षाच्या पारदर्शक कारभाराचाही काहींनी धसका घेतला होता. त्यामुळे दबाव तंत्राकरिता स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. १५ संचालकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. या घडामोडींवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांचे लक्ष होते. त्यामुळेच दोन दिवसापूर्वी हाऊसिंग फायनान्सच्या कार्यालयात बैठक घेऊन कोणते विषय मंजूर करायचे याबाबत चर्चा करण्यात आली. बॅंकेतील २१ संचालकांपैकी सर्वाधिक १६ संचालक कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तीन पक्षाच्या गटातील आहे.
भाजपातील काहींची महत्त्वाकांक्षा पाहता आघाडीच्या नेत्यांनी अतिशय सावध पवित्रा घेतला आहे. बॅंकेतील सत्ता स्थापनेच्या वेळी ठरलेला फाॅर्म्युलाच कायम राहावा अशी व्यूहरचना आघाडीच्या नेत्यांनी आखली आहे. त्यावेळी राष्ट्रवादीकडून स्वीकृत संचालक म्हणून ययाती नाईक यांचे नाव निश्चित करण्यात आले होते.
तर शिवसेनेच्या वाट्याला एक स्वीकृत संचालक देण्यात आले आहे. त्यातही माजी पालकमंत्र्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचे नाव चर्चेत आहे. कॉंग्रेसला शिखर बॅंकेवर सदस्य पाठविण्याची संधी दिली आहे. आता हा ठरलेला फाॅर्म्युला शेवटपर्यंत बॅंकेतील संचालक मंडळाच्या बैठकीत कायम राहावा यासाठी १०५ जागांच्या भरती प्रक्रियेला मान्यतेचा विषयही सोबत ठेवण्यात आला. शिवाय बोरीअरब येथील सूत गिरणीला अर्थसाहाय्य करण्याचा ठरावही याच बैठकीत घेतला जाणार आहे. खबरदारी म्हणून आघाडीच्या नेत्यांनी अनौपचारिक बैठकीतच संचालकांच्या सह्या घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे बंडाचे निशाण उभे करणारे सध्या तरी शांत झाले आहे. मात्र शेवटच्या क्षणी दगाफटका करता येईल का याची चाचपणी अजूनही सुरू आहे. बॅंकेच्या ४ जूनच्या बैठकीत नेते वरचढ ठरणार काय हे दिसणार आहे.
दबंग खासदारांची गोपनीय बैठक अनेकांच्या जिव्हारी
जिल्ह्याच्या राजकारणात अल्पावधीतच दबंग नेतृत्व म्हणून पुढे आलेल्या खासदारांनी स्वीकृत संचालकांच्या निवडीसाठी आपली स्वतंत्र फिल्डिंग लावली होती. त्याकरिता व्यावसायिक भागीदाराच्या घरी बैठक घेतली. यात भाजपातील एका इच्छुकाला संधी देण्याबाबत चाचपणी करण्यात आली. मात्र हा प्रकार खासदारांकडे मोठ्या आशेने पाहणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. आतापर्यंत पक्षातील ज्येष्ठांनी तडजोडीचे राजकारण करून कायम कार्यकर्त्यांचा बळी दिला. तोच कित्ता दबंग खासदारही गिरवित असल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या गटात खळबळ निर्माण झाली. संभाव्य धोका लक्षात घेऊन खासदारांनी आपला पवित्रा बदलविला आहे. मात्र त्यांच्या जोरावर ज्या इच्छुकांचे प्रयत्न सुरू होते, ते अजूनही शांत बसलेले नाही.