पुसदच्या पाणीटंचाईवर वादळ
By admin | Published: April 2, 2017 12:27 AM2017-04-02T00:27:17+5:302017-04-02T00:27:17+5:30
पंचायत समितीची वार्षिक आमसभा पाणीटंचाई, घरकूल योजनेतील अपहार, जलयुक्त शिवारची बोगस कामे,
पंचायत समिती आमसभा : जलयुक्त शिवारच्या बोगस कामांवर आक्षेप
पुसद : पंचायत समितीची वार्षिक आमसभा पाणीटंचाई, घरकूल योजनेतील अपहार, जलयुक्त शिवारची बोगस कामे, गटविकास अधिकाऱ्यांची मनमानी, अधिकाऱ्यांची दांडी, भ्रष्टाचाराचे आरोप यावरून वादळी ठरली. कोणतीही ठोस उपाययोजना किंवा कार्यवाही न करता परस्परविरोधी आरोपातच सभेचे सूप वाजले.
पुसद तालुक्यातील ग्रामीण जनतेला शासकीय योजनेचा लाभ मिळावा, सर्वांना सुविधा मिळाव्या यासाठी दरवर्षी पुसद पंचायत समितीमध्ये आमसभा घेतली जाते. यामध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि सरपंच आदींचा समावेश असतो. ३१ मार्च रोजी पंचायत समितीच्यावतीने आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार मनोहरराव नाईक होते. पंचायत समिती सभापती देवबा मस्के, उपसभापती गणेश पागिरे, जिल्हा परिषद सदस्य अमेय नाईक, बाळा पाटील, रंजना पंडित घाडगे, विमल आडे, साहेबराव धबाले, गजानन उघडे, भोलेनाथ कांबळे, ज्योती चिरमाडे, पंचायत समिती सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.
या आमसभेत विश्वास भवरे, सुधाकर कांबळे, नारायण पुलाते, डॉ.राठोड यांनी समस्या मांडल्या. आमसभेची नोटीस ही आठ दिवसांपूर्वी मिळायला पाहिजे. पण केवळ एक दिवसापूर्वी सभेची नोटीस दिली जाते. तसेच आमसभेत समस्यांचे कधीही निराकरण होत नाही. चर्चा केवळ सभेपुरतीच होते. नंतर त्यावर कोणतीही चर्चासुद्धा होत नाही. गटविकास अधिकाऱ्यांवर तीव्र आक्षेप उठवित त्यांच्या कार्यप्रणालीबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. शासकीय योजनेची माहिती अधिकाऱ्यांनाच नाही, असाही आरोप करण्यात आला. जलयुक्त शिवारची कामेही निव्वळ थातूरमातूर करून अधिकारी बिले हडप करीत आहे, असा आरोप सदस्यांनी केला.
एकंदरीत ही आमसभा फक्त वादळीच ठरली. यामध्ये कोणतेही ठोस असे कार्य साधले गेले नाही, अशी ओरड सर्वसामान्य नागरिकांतून केली जात आहे. नुकत्याच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य निवडून आले. त्यांची ही पहिलीच आमसभा असून ही सभा वादळी ठरली, हे लक्षात आल्याने नवनिर्वाचित सदस्य पुढील आमसभा नियोजनबद्ध व चांगल्यारितीने व्हावी, यासाठी प्रयत्न करतील, प्रश्न सोडवतील, अशी अपेक्षा जनता व्यक्त करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)