क्रांतिदिनी उठले आंदोलनांचे वादळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 10:17 PM2019-08-09T22:17:15+5:302019-08-09T22:17:44+5:30
९ आॅगस्टचा क्रांतिदिन हे औचित्य साधून राज्य सरकारचा सरता कालावधी लक्षात घेऊन विविध संघटनांनी प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी आवाज बुलंद केला. रोजीरोटीचा सवाल घेऊन जसे लोक रस्त्यावर उतरले, तसेच शैक्षणिक गुणवत्ता जपण्याच्या इरादा व्यक्त करीत ‘राष्ट्रनिर्माण रॅली’ही काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ९ आॅगस्टचा क्रांतिदिन हे औचित्य साधून राज्य सरकारचा सरता कालावधी लक्षात घेऊन विविध संघटनांनी प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी आवाज बुलंद केला. रोजीरोटीचा सवाल घेऊन जसे लोक रस्त्यावर उतरले, तसेच शैक्षणिक गुणवत्ता जपण्याच्या इरादा व्यक्त करीत ‘राष्ट्रनिर्माण रॅली’ही काढण्यात आली. सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या चळवळी अंतर्गत आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान पेटविण्यात आले. तर आशा सेविका, अंगणवाडीताई, महसूल कर्मचारी आदींच्या विविध मागण्यांनी वातावरण आंदोलनमय केले होते. तर त्याचवेळी काँग्रेसच्या वतीने ‘ईव्हीएम हटाव देश बचाव’चा नारा देत आंदोलन छेडण्यात आले. दैनंदिन जगण्याचे प्रश्न, राजकीय आकांक्षा आणि समाजाभान जपणाऱ्यांनी एल्गार पुकारल्याचे यावेळी दिसून आले.
‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ ही मोहीम तीव्र झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी या मोहिमेअंतर्गत यवतमाळात राष्ट्रनिर्माण रॅली काढण्यात आली. जिल्हाभरातून एकत्र आलेल्या नागरिकांची ही रॅली प्रचंड लक्षवेधी ठरली. शिस्तबद्ध वाटचाल आणि गुणवत्ता वाचविण्याचा आक्रोश यामुळे रॅलीने लक्ष वेधून घेतले. राज्य शासनाने अलिकडेच मराठा समाज आणि आर्थिक मागासांना आरक्षण लागू केले. त्यामुळे संविधानाने घालून दिलेली आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून राज्यातील आरक्षणाचे प्रमाण ७८ टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याबद्दल यावेळी आवाज उठविण्यात आला. या राष्ट्रनिर्माण रॅलीमध्ये खुल्या प्रवर्गातील हजारो महिला-पुरुषांसह, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.
यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने बसस्थानक चौकात ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात आले. ‘ईव्हीएम हटाव देश बचाव’ असे नारे यावेळी देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला यावेळी अभिवादन करण्यात आले. आशा स्वयंसेविकांनी वेतनाच्या मागणीसाठी आयटकच्या नेतृत्वात तिरंगा चौकात आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वात अंगणवाडीतार्इंनी जिल्हा परिषदेपुढे एल्गार पुकारला. त्यांनी मानधनवाढ आणि पेन्शनसाठी जेलभरो आंदोलन केले. किसानसभेने कर्जमाफीसाठी धरणे दिले. आॅल इंडिया युथ फेडरेशनच्या नेतृत्वात २४ लाख रिक्त पदांच्या भरतीसाठी आंदोलन करण्यात आले. शिवाय प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी एक तास जादा काम करून प्रतिकात्मक आंदोलन केले. महसूलप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचाºयांनीही प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी आंदोलन केले. जिकडे जावे तिकडे आंदोलनाचेच वातावरण असल्यामुळे शहरातील दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. यवतमाळ शहरात सर्वत्र आंदोलनमय वातावरण असताना जिल्ह्यातील विनाअनुदानित शाळांमधील प्राध्यापकांनीही क्रांतिदिनाचे औचित्य साधून शुक्रवारपासूनच ‘नो पेमेंट नो वर्क’ हे अभिनव आंदोलन सुरू केले. क्रांतिदिनी पुढे आलेल्या मागण्यांवर शासन कोणती भूमिका घेते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
आदिवासी दिनानिमित्त बाईक रॅली
क्रांतिदिनी सर्वत्र आंदोलने होत असताना आदिवासी समाजबांधवांनीही आपली अस्मिता जपली. ९ आॅगस्ट हा जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी समाजबांधवांनी शुक्रवारी सकाळी यवतमाळ शहरातून दुचाकी रॅली काढली. शहरात फिरल्यानंतर तिरंगा चौकात रॅलीचा समारोप झाला. यावेळी मान्यवरांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले.