तरुण आईच्या दुसऱ्या प्रेमाची अजब कहाणी

By admin | Published: May 21, 2017 12:22 AM2017-05-21T00:22:07+5:302017-05-21T00:22:07+5:30

आयुष्याच्या वाटचालीत हृदय बहकले, तर मेंदू गुडघ्यात उतरतो आणि चुकलेले निर्णय माणसाला बरबादीकडे नेतात.

The strange story of young mother's second love | तरुण आईच्या दुसऱ्या प्रेमाची अजब कहाणी

तरुण आईच्या दुसऱ्या प्रेमाची अजब कहाणी

Next

पोटच्या पोराचा विसर : पहिला प्रियकर सोडून दुसऱ्यासोबत केला गोव्यात घरठाव
सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आयुष्याच्या वाटचालीत हृदय बहकले, तर मेंदू गुडघ्यात उतरतो आणि चुकलेले निर्णय माणसाला बरबादीकडे नेतात. शारीरिक आकर्षणाच्या लहरीवर तरंगणाऱ्या मनाला प्रेमाचे स्वप्नही वारंवार पडू लागते. असे प्रेम दारूपेक्षाही भयंकर व्यसन ठरते. हेच व्यसन जडले म्हणून यवतमाळातील एक तरुण आई पोटच्या पोराला टाकून, प्रियकराला सोडून गोव्याला पळून गेली... दुसऱ्या प्रियकरासोबत!
हल्लीच्या प्रेमकहाण्या म्हणजे, दोघांची नजरानजर, मग भेटीगाठी, थोडा कौटुंबिक विरोध आणि सरतेशेवटी लग्न. इथे कहाणी संपते. पण यवतमाळात अशाच ‘हॅप्पी एंडिंग’पासून दुसऱ्या प्रेमाची अजब ‘बिगीनिंग’ झाली. यवतमाळच्या एका वस्तीतील या कहाणीची नायिका (किंवा खलनायिका) थेट गोव्यापर्यंत पोहोचली.
सात वर्षांपूर्वी झाले असे की, २६ वर्षांची तरुणी एका तरुणाच्या प्रेमात पडली. त्याच्याचसोबत विवाहबद्धही झाली. त्या दोघांच्या संसारवेलीवर फूल उमलले. त्यांचा गोंडस मुलगा आता पाच वर्षांचा आहे. नवरा-बायको आताही प्रियकर-प्रेयसीसारखेच गोडीगुलाबीने संसार करीत होते. पण तिच्या हाती मोबाईल आला आणि मोबाईलवर एक दिवस ‘मिस्ड कॉल’ आला. इथेच गाडीने रूळ सोडला. मिस्ड कॉलला तिने प्रतिसाद दिला. पलिकडे बोलणारा तरुण होता. तो कोण, कुठला ठाऊक नव्हते. पण शब्दा-शब्दाने प्रारब्ध बिघडत गेले. आकर्षण वाढत गेले. दररोजच कॉलिंग सुरू झाले. पाच वर्षांच्या मुलाची आई उपवर वधूसारखी, पहिल्यांदाच प्रेमात पडल्यासारखी तासन्तास मोबाईलवर बोलू लागली. प्रेमळ नवरा अन् पोटचा मुलगा तिच्या जगातून हद्दपार झाले.
सलग चार महिने हे अभद्र मोबाईल संभाषण सुरू होते. व्हॉटस्अ‍ॅपमुळे फोटो शेअरिंगही होत होते. ती रात्री उशिरापर्यंत त्याच्याशी आॅनलाईन राहात होती. यातूनच त्याने तिची भेट घेण्याचा निश्चय केला. तो नागपुरात आला, तिथे दोघांची भेट झाली. तिने १४ एप्रिल रोजी कुणाला काहीएक न सांगता थेट नागपूर गाठले. तेथून ती दुसऱ्या प्रियकरासोबत गोव्याला पोहोचली. इकडे तिच्या अचानक बेपत्ता होण्याने सर्वांचीच कालवाकालव झाली. पाच वर्षांचा चिमुकला आईसाठी धाय मोकलून रडू लागला. शेवटी सासर आणि माहेरच्यांनी पोलीस ठाणे गाठले. पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. सुरुवातीला या प्रकरणाचा छडा लावताना पोलिसांचाही चांगलाच कस लागला. शेवटी त्यांनी तांत्रिक बाजूवर लक्ष केंद्रित केले. तेव्हा ‘मिस्ड कॉल’वरून जुळलेले प्रेमप्रकरण पुढे आले. या प्रकरणाचा शोध शहरचे ठाणेदार नंदकुमार पंत यांच्या मार्गदर्शनात जमादार रामलाल शर्मा, पोलीस उपनिरीक्षक अमोल चौधरी, शिपाई आशीष जाधव यांनी पूर्ण केला.

छडा लागला, तरी हाती अपयशच
तिचा माग काढत यवतमाळ शहर पोलीस थेट गोव्यात पोहोचले. तिने तिथे दुसऱ्या प्रियकरासोबत नव्याने संसार थाटला होता. गवंडी काम करणारा ‘तो’ मूळचा कर्नाटकातील असून गोव्यातील पिलेनमायना येथे भाड्याच्या खोलीत राहातो. याच खोलीवर पोलीस आणि तिचे नातेवाईक धडकले. तेव्हा साऱ्यांसमोर तिने यवतमाळला परत येण्यास स्पष्ट नकार दिला. पोटच्या गोळ्याशीही संबंध नसल्याचे सांगितले. हतबल झालेला पहिला प्रियकर पती, तिचे आई-वडील रिकाम्या हाताने परतले. वृद्ध आईवडिलांना मुलाने पोसण्यास नकार दिला, तर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. मात्र, चिमुरड्या मुलाला तरुण आई सोडून गेली, तर त्या मुलासाठी कायदा नाही. अशा प्रकरणात तरुण आईलाही कायद्याने मुलापर्यंत आणण्याची तरतूद केली जावी, अशी मागणी पुढे येत आहे.

 

Web Title: The strange story of young mother's second love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.