रस्त्यावरचे ‘सपनो के सौदागर’ संकटात
By admin | Published: September 19, 2015 02:21 AM2015-09-19T02:21:32+5:302015-09-19T02:21:32+5:30
हजारो तरुण नोकरीचे स्वप्न पाहतात. साऱ्यांचेच पूर्ण होतात, असे नाही. पण सचोटीच्या लढवैय्यांना यश मिळतेही.
नोकरीचे अर्ज विक्रेते : आॅनलाईन प्रक्रियेमुळे ओसरली गर्दी
अविनाश साबापुरे यवतमाळ
हजारो तरुण नोकरीचे स्वप्न पाहतात. साऱ्यांचेच पूर्ण होतात, असे नाही. पण सचोटीच्या लढवैय्यांना यश मिळतेही. बेरोजगारांच्या उरातील या स्वप्नांवरच काही जणांनी स्वत:चा रोजगार शोधलाय. रस्त्यावर नोकरीचे अर्ज विकून तरुणांना स्वप्नाकडून सत्याकडे नेणाऱ्या या ‘सौदागरांना’ही आता ५० टक्के तोट्याचा सामना करावा लागतोय.
यवतमाळ शहरात पोस्ट आॅफिस चौकात पूर्वी पाच जणांची दुकाने होती. परंतु, आॅनलाईन पद्धतीमुळे मजुरी निघणेही कठीण झाल्याने यातील ३ दुकाने बंदी झाली. तिवारी, पाटील, नगराळे नामक तरुणांना आपली दुकाने दोन वर्षांपूर्वी गुंडाळावी लागली. आता केवळ सिद्धार्थ बनकर आणि काळे यांची दुकाने कशीबशी सुरू आहेत. दररोज साधारण ९०-१०० अर्जांची विक्री करणाऱ्या या दुकानातून आता दिवसाला १५-२० अर्जच जातात. सिद्धार्थ बनकर हा मूळच नेर तालुक्यातला (पिंपरी) शेतकरी. पण पदवीपर्यंत शिकल्यावरही नोकरी न मिळाल्याने त्याने थेट नोकरीचे अर्ज विकण्याचाच व्यवसाय पत्करला. पोस्ट आॅफिसपुढे दिवसभर बसून कसाबसा १००-२०० रुपये तो मिळवतो. गेल्या पाच वर्षांच्या काळात हजारो बेरोजगार तरुणांनी त्याच्याकडून अर्ज नेले. ज्यांना नोकरी मिळाली, त्यातील बऱ्याच जणांनी परत येऊन सिद्धार्थला आवर्जुन धन्यवादही दिले. त्यांच्या स्वप्नांचा सिद्धार्थ साक्षीदार आहे. यात सिद्धार्थचे नुकसानच असते. पण तो म्हणतो, कसेही का होईना, पोरांना नोकरी मिळाली पाहिजे. या सदिच्छेच्या बळावरच तो रस्त्यावर बसूनही दोन मुलांचा संसार यशस्वीपणे सांभाळतोय. बेरोजगारांच्या स्वप्नांना हवा देणारा सिद्धार्थ स्वत:च्याही यशाचे स्वप्न पाहतो.
जिल्ह्यातले तरुण ‘होमसिक’
जिल्ह्यातील हजारो तरुण नोकरीचे अर्ज सिद्धार्थकडून नेतात. या बेरोजगार मुलांविषयी सिद्धार्थचे निरीक्षण अत्यंत मार्मिक आहे. तो म्हणतो, आपली मुलं खूप महत्त्वाकांक्षी नाहीत. लिपीक आणि शिपाई पदाच्या जागा निघाल्या की, माझ्याकडे अर्ज नेण्यासाठी गर्दी होते. पण उच्च पदांसाठी फार गर्दी नसते. त्या पदांची भरती कदाचित आॅनलाईनही होत असावी. दुसरे असे की, आपल्याच ‘प्रॉपर’च्या जागा निघाल्या की, भराभर अर्ज खपतात. पण बाहेर जिल्ह्यातल्या जागा असल्या तर काही मोजकेच तरुण फॉर्म नेतात. आजचे तरुण होमसिक झाले आहे.