गावरान गायीचे अस्तित्व संपण्याच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 09:59 PM2021-12-14T21:59:00+5:302021-12-14T21:59:44+5:30
Yawatmal News देशी गायीची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याची धक्कादायक बाब सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
यवतमाळ : यांत्रिकीकरणाच्या युगात पशुधनाची संख्या घटत आहे. यातही दूध उत्पादनात पशुपालकांनी गायीची संख्या वाढविली आहे. पूर्वीच्या तुलनेत या संख्येमध्ये चार पटीने वाढ नोंदविण्यात आली आहे. यासोबतच देशी गायीची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याची धक्कादायक बाबही सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
देशी गायीचे दूध, तूप, शेणखत याची मोठ्या प्रमाणात मागणी असते. सेंद्रिय उत्पादनात आणि पाैष्टिक आहारासाठी देशी गायीच्या दूध उत्पादनाला मागणी आहे; मात्र यातून फारसे उत्पादन येत नाही. त्या तुलनेत संकरित गायीच्या दुधाचे उत्पादन सर्वाधिक आहे. यातूनच गोपालकांनी संकरित गायीची संख्या वाढविली आहे. त्यामुळे दूध संकलन केंद्रावर संकरित गायीचे दूध सहज उपलब्ध होते. तर म्हैस आणि देशी गायीच्या दुधाकडे पिछेहाट पाहायला मिळते.
घोडे कमी, गाढव जास्त
जिल्ह्यातील घोड्यांची संख्या कमी झाली आहे; मात्र त्या तुलनेत गाढवांची संख्या मात्र कमालीची वाढली आहे. गाढवांवरून मोठ्या प्रमाणात वाळूची ने-आण करण्यासाठी त्याचा वापर जिल्ह्यामध्ये होत आहे.
सर्वात कमी पशुधन झरीजामणी तालुक्यात
सर्वात कमी पशुधन असणारा तालुका म्हणून झरीजामणी तालुक्याकडे पाहिले जाते. या ठिकाणी गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी-मेंढी याची संख्या मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत याठिकाणच्या पशुधनाची संख्या कमी आहे. याचा शेती व्यवसायावर परिणाम झाला.
सर्वात जास्त पशुधन पुसद तालुक्यात
हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंतराव नाईकांच्या गृह तालुक्यात पशुधनाची संख्या सर्वाधिक आहे. या ठिकाणचा आदर्श या भागातील नागरिकांनी कायम ठेवला आहे. त्यांना पशुधनाचे महत्त्व कळल्याने या ठिकाणच्या पशुधनाची संख्या सर्वाधिक आहे.
संकरित गायीचे दूध किती पाैष्टिक?
देशी गायीच्या तुलनेत संकरित गायींची संख्या चारपट वाढली आहे. जिल्हाभरात संकरित गायीचे दूध वितरित होते.
देशी गायीच्या दुधाला आणि तुपाला सर्वाधिक मागणी आहे; मात्र देशी गायीच्या दुधाचे उत्पादन कमी आहे.
देशी गायी वाढविण्यावर पशुपालकांचा भर राहिलेला नाही. उत्पादन मिळवून देणाऱ्या संकरित गायीकडे लक्ष आहे.