दूध, तेलाची ‘ताकद’ वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 11:16 PM2019-05-11T23:16:09+5:302019-05-11T23:16:37+5:30
मानवी शरीराला अत्यावश्यक असलेले व्हिटॅमिन्स अन्नद्रव्यांमधून पुरेशा मात्रेत मिळत नाही. परिणामी याची डिफीसेन्सी (कमतरता) आढळून येते. ही उणीव भरुन काढण्यासाठी दैनंदिन सेवनातील दूध व खाद्य तेलाला आणखी पौष्टिक केले जाणार आहे.
सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मानवी शरीराला अत्यावश्यक असलेले व्हिटॅमिन्स अन्नद्रव्यांमधून पुरेशा मात्रेत मिळत नाही. परिणामी याची डिफीसेन्सी (कमतरता) आढळून येते. ही उणीव भरुन काढण्यासाठी दैनंदिन सेवनातील दूध व खाद्य तेलाला आणखी पौष्टिक केले जाणार आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने पुढाकार घेतला आहे. उत्पादकांना अमरावती येथे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
व्हिटॅमिन्सच्या (जीवनसत्व) कमतरतेमुळे अनेक आजार जडतात. प्रामुख्याने व्हिटॅमिन्स ए, डी व ई याची कमतरता खाद्य अन्नांमध्ये दिसत आहे. नैसर्गिक प्रक्रियेद्वारे व्हिटॅमिन्स शरीराला खाद्यान्नातून मिळणे आवश्यक आहे. हे व्हिटॅमिन्स नसल्याने गंभीर स्वरूपाचे आजार जडतात. मानवाच्या इंद्रियावर याचा गंभीर स्वरूपाचा परिणाम होतो. डब्ल्यूएचओकडून याबाबत मोठे अभियानही राबविले जाते. दैनंदिन सेवनात येत असलेल्या दुधातून किंवा खाद्य तेलातून असे व्हिटॅमिन्स देता येईल का याचा शोध अन्न व औषध प्रशासन विभागाने घेतला. त्यासाठी दूध व तेल उत्पादकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. अमरावती येथे या संदर्भात कार्यशाळा झाली. विविध संस्थांनी व तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख दूध उत्पादक, शासनाच्या या आव्हानाला प्रतिसाद देत फोर्टीफाईड दूध तयार करण्यासाठी पुढे आले आहे. यामध्ये वात्सल्य, रानडे, अमृतधारा, नमस्कार, हिंदूजा महिला को.आॅप. सोसायटी यांनी सहभाग घेतला. या प्रमाणेच तेल उत्पादकांमध्ये नेर, बोरीअरब, पुसद, वणी, दिग्रस येथील फर्मचा समावेश आहे.
फोर्टीफाईड दूध व तेल
सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून व्हिटॅमिन्स ए, डी व ई ओळखले जाते. याची कमतरता दूर करण्यासाठी अतिरिक्त मात्रेत ते दूध व खाद्य तेलात शास्त्रशुद्ध पद्धतीने मिसळण्यात येते. अशा तेल व दुधाला शास्त्रीय भाषेत फोर्टीफाईड दूध, तेल म्हणून संबोधले जाते. याचा वापर वाढविण्यावर भर दिला जात आहे.
व्हिटॅमिन्सची कमतरता औषधातून भरुन काढण्याऐवजी फोर्टीफाईड दूध व तेलाचा पर्याय चांगला आहे. दैनंदिन सेवनातून शरीराची जीवनसत्त्वाची गरज भागविता येणार आहे. यासाठी उत्पादकांना सक्ती नाही, त्यानंतरही सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला.
- गोपाल माुहरे
अन्न निरीक्षक, यवतमाळ