महिला स्वयंसहाय्यता प्रकल्पाला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:17 AM2017-07-18T01:17:59+5:302017-07-18T01:17:59+5:30

जिल्ह्यातील ग्रामीण महिला स्वयंसहायता प्रकल्पासाठी मुंबईच्या ग्रँड मराठा फाऊंडेशनने २५ लाख रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे.

Strengthen the Women's Self-Help Project | महिला स्वयंसहाय्यता प्रकल्पाला बळ

महिला स्वयंसहाय्यता प्रकल्पाला बळ

Next

‘ग्रँड मराठा’ : २५ लाख रुपयांच्या निधीची घोषणा, शेतकरी स्वावलंबन मिशनचा कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील ग्रामीण महिला स्वयंसहायता प्रकल्पासाठी मुंबईच्या ग्रँड मराठा फाऊंडेशनने २५ लाख रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन प्रकल्पाच्या पांढरकवडा येथे झालेल्या कार्यक्रमात हा निर्णय जाहीर करण्यात आला. बळीराजा चेतना अभियानांतर्गत हा निधी दिला जाणार आहे.
यावेळी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, उद्योग समूहाचे उपाध्यक्ष रोहित शेलाटकर, ग्रँड मराठा फाऊंडेशनचे राजेश तावडे, अनुसूचित क्षेत्र स्थानिक विकास स्वराज्य मंडळचे अध्यक्ष तुळशीराम कुमरे, उपविभागीय कृषी अधिकारी राहूल सातपुते, सचिव प्रवीण कुळकर्णी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धर्माजी आत्राम, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे संचालक सी. यू. पाटील, पंजाबराव कृषी विद्यापीठ कापूस बियाणे संशोधन केंद्र अकोलाचे डॉ. टी. एच. राठोड ,केव्हीसीचे संचालक डॉ.एस.यू. नेमाडे, माजी नगराध्यक्ष अनिल तिवारी आदी उपस्थित होते.
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आणि ग्रामीण महिलांच्या स्वयंसहायता प्रकल्पाच्या पहिल्या केंद्रासाठी अनिवासी भारतीय व इंग्लंड येथील एका मोठ्या उद्योग समूहाने पुढाकार घेतला आहे. शेतीउत्पन्नात वाढ व कृषीमालाला गावस्तरावर प्रक्रिया करून थेट ग्राहकांना विकण्याच्या ‘पेसा’ मधील २०० ग्रामपंचायतींना याचा लाभ होणार आहे. यावेळी ५० शेतकरी विधवांना डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाकडून सरळ वाणाच्या कापसाच्या बियाण्यांचे तर, कृषी विभागामार्फत युरियाचे दिलासा संस्थेकडून वाटप करण्यात आले. ग्रँड मराठा फाऊंडेशनतर्फे महिला स्वयंसहाय्यता प्रकल्पाला आर्थिक मदत देण्यात आली .
ग्रँड मराठा फाऊंडेशनचे राजेश तावडे यांनी सांगितले, शेतकरी विधवांच्या पाल्यांना गेली पाच वर्षांपासून विदर्भ जनआंदोलन समितीच्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी मदत दिली जात आहे. यापुढेही ही मदत गरजू पाल्यांना देण्यात येईल, असे ते म्हणाले. याप्रसंगी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, पांढरकवडा वनविभागाचे उपवनसंरक्षक गुरुप्रसाद, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे संचालक सी. यू. पाटील, डॉ.टी. एच. राठोड, डॉ. एस. यू.नेमाडे आदींनी मार्गदर्शन केले.
संचालन अर्पणा मालिकर, आभार पंचायत राज अधिकारी विनकरे यांनी मानले. यावेळी मानद वन व वन्यजीव संरक्षक प्रा. डॉ. विराणी, आदिवासी प्रकल्प अधिकारी डाखोरे, मंडळ विकास अधिकारी घसाळकर, सुरेश बोलेनवार, मोहन जाधव, अंकित नैताम, अब्दुला गिलानी, नितीन कांबळे, नंदू जयस्वाल, भीमराव नैताम, शेखर जोशी, हिवराचे सरपंच विलास आत्राम, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य लेतुजी जुनघरे आदी उपस्थित होते.

Web Title: Strengthen the Women's Self-Help Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.