दमदार पाऊस तरीही प्रकल्प तहानलेलेच
By admin | Published: July 18, 2016 12:49 AM2016-07-18T00:49:30+5:302016-07-18T00:49:30+5:30
जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस कोसळत असला तरी मोठे आणि मध्यम प्रकल्प अद्यापही तहानलेलेच दिसत आहे.
४७८ मिमी नोंद : मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमध्ये निम्माच जलसाठा, पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पांची स्थितीही जेमतेम
यवतमाळ : जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस कोसळत असला तरी मोठे आणि मध्यम प्रकल्प अद्यापही तहानलेलेच दिसत आहे. वार्षिक सरासरीच्या निम्मा पाऊस पडूनही प्रकल्पात अपेक्षित जलसाठाच झाला नाही. बहुतांश प्रकल्पात क्षमतेच्या अर्धा अधिक जलसाठा झाला असून या प्रकल्पांना आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
यवतमाळ जिल्ह्यात एक मोठा, पाच मध्यम आणि ६२ लघु प्रकल्प आहे. सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी याप्रकल्पाचा उपयोग होता. अलिकडच्या काही वर्षात अपुऱ्या पावसाने या प्रकल्पात पुरेसा जलसाठा झालाच नाही. मात्र यंदा वरूण राजाच्या कृपेने जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्प तुडुंब भरतील, अशी आशा आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वार्षिक सरासरीच्या निम्मा पाऊस झाला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ९११.३४ मिमी असून आतापर्यंत जिल्ह्यात ४७८ मिमी पाऊस कोसळला आहे. नदी, नाल्यांना पूर आला होता. मात्र प्रकल्पांमध्ये अद्यापही पुरेसा जलसाठा झाला नाही.
पुसद तालुक्यातील पूस प्रकल्पात ३९ टक्के, दिग्रस तालुक्यातील अरुणावती प्रकल्पात २५.६१ टक्के, बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पात २९ टक्के, दारव्हा तालुक्यातील गोखी प्रकल्पात ६० टक्के, यवतमाळ तालुक्यातील वाघाडी प्रकल्पात ४५ टक्के, बोरगाव प्रकल्पात ६७ टक्के, महागाव तालुक्यातील वेणी येथील लोअरपूस प्रकल्पात ५२ टक्के, अडाण प्रकल्पात २७.९३ टक्के आणि मारेगाव तालुक्यातील नवरगाव प्रकल्पात ६४.५३ टक्के जलसाठा झाला आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पापैकी केवळ पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. या प्रकल्पात सध्या १०० टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील ६२ लघु प्रकल्पांमध्ये ५२ टक्के जलसाठा झाला असून त्यापैकी कापरा, सिंगनडोह, रूई, इठोडा, किन्ही, पहूर, नरसाळा, पोफाळी, पोखरी, निंगनूर, दराटी, तरोडा हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहे. मात्र इतर प्रकल्पात अद्यापही निम्माच जलसाठा आहे.
गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पाऊस कोसळत आहे. सध्याही ढगाळी वातावरण आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा जलसाठा निश्चितच वाढणार आहे. हे प्रकल्प तुडुंब झाल्यास रबी हंगामात सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. (नगर प्रतिनिधी)