एसटीला सलग तिसऱ्या दिवशी आंदोलनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2021 05:00 AM2021-10-31T05:00:00+5:302021-10-31T05:00:06+5:30
या संपाचा परिणाम म्हणून महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या. त्यामुळे सर्व वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, अशी मागणी रेटून धरली. याही दिवशी काही कामगार संपावर गेले होते. परिणामी दुसऱ्या दिवशी १४ ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी महामंडळातील काही कर्मचारी संपात उतरले आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी महामंडळाच्या यवतमाळ विभागाला आर्थिक फटका बसला. शनिवारी सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले.
गुरुवारी कर्मचारी कृती समितीच्या पुढाकारात विभागीय पातळीवर उपोषण करण्यात आले. यातून काही मार्ग न निघाल्यास बेमुदत बंदचा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला. दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील जवळपास आगारातील वाहतूक बंद होती. यादिवशी यवतमाळ विभागाला ३० ते ३५ लाख रुपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागले.
या संपाचा परिणाम म्हणून महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या. त्यामुळे सर्व वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, अशी मागणी रेटून धरली. याही दिवशी काही कामगार संपावर गेले होते. परिणामी दुसऱ्या दिवशी १४ ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले.
शनिवारी तिसऱ्या दिवशीही विलीनीकरणाची मागणी लावून धरत काही कर्मचारी संपावर गेले. पांढरकवडा आगाराच्या पूर्ण बसफेऱ्या थांबल्या. दिग्रस आणि राळेगाव आगारात २५ टक्क्यांहून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. यादिवशीही आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान एसटीला सहन करावे लागले.
बाहेरच्या आगाराची मदत
- पांढरकवडा, दिग्रस आणि राळेगाव आगारातील बसफेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बाहेरच्या आगाराची मदत घेण्यात आली. पांढरकवडा येथे वणीच्या बसेस बोलावण्यात आल्या. दिग्रस येथे वाहतुकीसाठी पुसदची, तर राळेगावकरिता यवतमाळ आगारातून बस रवाना करण्यात आल्या. तरीही नेहमीइतक्या फेऱ्या होऊ शकल्या नाही. वणी आगाराने चंद्रपूरसाठी मदत पोहोचविली.
कर्मचाऱ्यांना ताकीद
- कामावर हजर व्हा, नाहीतर सेवा समाप्तीसारखी कारवाई केली जाईल, अशी ताकीद संपावरील कर्मचाऱ्यांना महामंडळाने दिली आहे. यवतमाळ विभागातील १५० हून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. पांढरकवडा आगारातील ३२, यवतमाळ २२, राळेगाव ४८ आणि दिग्रस आगारातील २२ कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणासाठी संपात उडी घेतली आहे.