प्रहारच्या दणक्याने प्रशासन हादरले....! आत्महत्याग्रस्त कुटुंबातील 'रुक्मिणीस' मिळणार सिंचन विहिरीचा लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 06:52 PM2017-12-19T18:52:03+5:302017-12-19T18:53:11+5:30
आर्णी तालुक्याच्या ज्या दाभडीत शेतकरी प्रश्नानावर मोदींनी चाय पे चर्चा केली, केंद्रात व राज्यात सत्ता मिळवली त्याच आर्णी तालुक्यातील दाभडी गावात विठ्ठल सवाई राठोड या शेतकऱ्याने २०१४ साली आत्महत्या केली.
यवतमाळ - आर्णी तालुक्याच्या ज्या दाभडीत शेतकरी प्रश्नानावर मोदींनी चाय पे चर्चा केली, केंद्रात व राज्यात सत्ता मिळवली त्याच आर्णी तालुक्यातील दाभडी गावात विठ्ठल सवाई राठोड या शेतकऱ्याने २०१४ साली आत्महत्या केली. शासनाने एक लाखाची मदत केली पण विठ्ठल च्या आत्महत्येनंतर त्याची विधवा पत्नी रुक्मिणीस मात्र प्रशासनाच्या थट्टेचा सामना करावा लागला.
सिंचन विहिरीचा लाभ मिळावा म्हणून सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यावर सुद्धा तब्बल ३ वर्षांपासून तिची हेळसांड थांबत नव्हती. अखेर प्रहार जनशक्ती पक्षाच्या महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रमोद कुदळे यांनी आपल्या सहकार्या सह पंचायत समिती कार्यालयात ठिय्या मांडला अन प्रशासन खडबडून जागे झाले.
३ वर्षांपूर्वीचा प्रस्ताव गहाळ झाल्याने संतप्त प्रहार कार्यकर्त्यांचे उग्र रूप पाहून तेथेच सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी, मनरेगा विभागातील कर्मचारी,दाभडी चे ग्रामसेवक,सरपंच,पटवारी हजर झाले.
युद्ध पातळीवर कागदपत्रे तयार करताना,जाग्यावर ठराव,प्रमाणपत्र पूर्ण झाले विजवीतरणचे कनिष्ठ अभियंता सुद्धा पंचायत समितीत आले त्यांनीही जागेवर प्रमाणपत्र दिले. तहसीलदारांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे प्रमाणपत्र लगेच पाठवून दिले आणि मग सिंचन विहिरीच्या नव्या प्रस्तावास तांत्रिक मान्यता देण्यात आली.
आता हा प्रस्ताव जिल्हापरिषदेला पाठविण्यात येणार आहे. पुढील दोन दिवसात त्यास मान्यता मिळेल. आज शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या मदतीला प्रहारचे निलेश आचमवार,अंकुश राजूरकर,श्रीकांत काळे,अनिकेत गरुड,अच्चू सैय्यद,प्रिन्स रामटेके,आकाश दाभने,आकाश कोते,अतुल इंगळे,अजय वरके,निलेश राठोड,प्रवीण राठोड,यश सकवान, प्रसेनजीत खंडारे,अभिषेक इंगोले,शुभम गरुड,अतुल इंगोले,देवशीष वानखडे,रुपेश मारबते,निखिल मंगाम,अतुल कोमावार यांच्या सह शेकडो प्रहार कार्यकर्ते ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते.