शाहीनबागच्या धर्तीवर यवतमाळात बेमुदत धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 06:00 AM2020-02-01T06:00:00+5:302020-02-01T06:00:20+5:30
येथील छोटी गुजरी परिसरातील जुनी अंजुमन शाळा या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. १ फेब्रुवारीपासून हे आंदोलन बेमुदत काळासाठी सुरू करण्यात येत आहे. यात दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत महिला धरणे देणार आहेत. यादरम्यान महिलांना आमंत्रित करून विविध प्रकारचे उपक्रमही राबविले जाणार आहे. त्याअंतर्गत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविध कलाकृती सादर केल्या जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून सध्या देशभरात रणकंदन माजले आहे. दिल्लीत शाहीनबाग आंदोलन सुरू आहे. त्याच धर्तीवर यवतमाळातही बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती यवतमाळ शाहीनबाग आंदोलन कमिटीच्या वतीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
येथील छोटी गुजरी परिसरातील जुनी अंजुमन शाळा या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. १ फेब्रुवारीपासून हे आंदोलन बेमुदत काळासाठी सुरू करण्यात येत आहे. यात दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत महिला धरणे देणार आहेत. यादरम्यान महिलांना आमंत्रित करून विविध प्रकारचे उपक्रमही राबविले जाणार आहे. त्याअंतर्गत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविध कलाकृती सादर केल्या जाणार आहे. शिवाय सीएए, एनआरसी, एनपीआर आदींबाबत माहिती दिली जाणार आहे. दिल्ली येथील शाहीनबागच्या महिलांनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने आंदोलनाला सुरूवात केली आहे. त्याला पाठिंबा देत देशभरात जिल्हा आणि तालुका पातळीवर जवळपास २०० ठिकाणी आंदोलन सुरू झाले आहे.
यवतमाळ येथेही महिला शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणार आहे. सीएए कायदा रद्द व्हावा, एनआरसी, एनपीआर थांबवावे, जेएमयू, एएमयू, जेएनयू येथील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची चौकशी व्हावी, देशात निर्माण झालेली अराजकता केंद्र सरकारने लवकरात लवकर नियंत्रणात आणावी, नागरिकांच्या मनातील भीती दूर करावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात मुस्लीम, अनुसूचित जाती, जमातीच्या व इतर धर्मीय महिलांचादेखील सहभाग राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
शांततापूर्ण मार्गानेच आंदोलन करावे
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी यवतमाळात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता. या आंदोलनावेळी शहरात आंदोलक आणि काही व्यापारी यांच्यात वाद झाला. आंदोलनात अशी घटना घडू नये, आम्ही अशा घटनांचा निषेध करतो. कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण मार्गानेच आंदोलन केले पाहिजे. पण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची पोलिसांचीही जबाबदारी होती, असे मत पत्रकार परिषदेत जमाते इस्लामी हिंदचे अध्यक्ष जियाउद्दीन यांनी व्यक्त केले. या पत्रकार परिषदेला जियाउद्दीन यांच्यासह मुफ्ती एजाज, अॅड. नासिर खिलजी, मौलवी शारीक मुजाहिदी, जमा खाँ, स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशनच्या सायमा रहमान आदी उपस्थित होते.