पाण्यासाठी महिलांची प्राधिकरणावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 08:59 PM2018-02-26T20:59:14+5:302018-02-26T20:59:14+5:30
जीवन प्राधिकरणाने १२ दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात काही भागात १६ दिवस लोटले तरी पाणी पोहोचलेच नाही. यामुळे संतप्त महिलांनी सोमवारी जीवन प्राधिकरणावर धडक दिली. महिला धडकताच प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पोबारा केला.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : जीवन प्राधिकरणाने १२ दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात काही भागात १६ दिवस लोटले तरी पाणी पोहोचलेच नाही. यामुळे संतप्त महिलांनी सोमवारी जीवन प्राधिकरणावर धडक दिली. महिला धडकताच प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पोबारा केला. यामुळे महिलांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला. पाण्याचे समान वाटप करण्याची मागणी केली आहे.
धामणगाव मार्गावरील गांधीनगर, नेहरूनगर, नारिंगेनगर आणि बांगरनगर भागात गत १६ दिवसांपासून पाण्याचा थेंब आला नाही. विशेष म्हणजे, प्राधिकरणाने जाहीर केलेल्या वेळापत्रकात या भागाचे नावच नाही.
यामुळे प्राधिकरणाच्या लेखी हा भाग निर्मनुष्य तर झाला नाही ना, असा जाब विचारण्यासाठी महिला प्राधिकरणावर धडकल्या होत्या. अधिकाऱ्यांना याची कुणकुण लागताच अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. यामुळे संतप्त महिलांना या ठिकाणी कुणीही भेटले नाही. प्रश्न न सुटताच त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
या भागातील महिलांनी पाण्याच्या असमान वाटपावर तीव्र शब्दात नाराजी नोंदविली. तत्काळ दुरूस्ती न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. यावेळी श्रृतिका वाघ, अर्चना राठी, पूजा राठी, शोभा दर्डा, जयश्री दानव, विद्या देशपांडे, माधुरी ठाकरे, मंगला महानुर, वसुधा देशमुख, सुनिता धारगावे, ललिता विधाते, प्रिती चन्ने, गीता लचके, प्रतिभा कुकडे आदी महिला उपस्थित होत्या.
या आहेत प्रमुख समस्या
शहरात मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी येत आहे.
काही भागात २४ तास नळ सुरू आहेत.
पाणी पुरवठ्याच्या वेळा पाळल्या जात नाही. मध्यरात्रीनंतरही नळ येतात.
मिळणारे ७० टक्के पाणी गढूळ असते.
वेळापत्रकात बदल झाला तरी सांगितला जात नाही.