तिवरंग येथे पाण्यासाठी दोन गटांत मारहाण
By admin | Published: April 10, 2016 02:44 AM2016-04-10T02:44:41+5:302016-04-10T02:44:41+5:30
उमरखेड तालुक्याच्या तिवरंग येथे नवीन गावठाणावर पिण्याचे पाणी भरण्यावरून दोन गटांत हाणामारी झाली.
महिलेसह तिघे जखमी : नांदेडला हलविले, १५ जणांविरुद्ध गुन्हा
मुळावा : उमरखेड तालुक्याच्या तिवरंग येथे नवीन गावठाणावर पिण्याचे पाणी भरण्यावरून दोन गटांत हाणामारी झाली. यात महिलेसह तीन जण जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ नांदेडला हलविण्यात आले.
मारोती मोतीराम जमदाडे, पंचफुला मारोती जमदाडे, विलास मारोती जमदाडे अशी जखमींची नावे आहे. या प्रकरणी पोफाळी पोलीस ठाण्यात जीवन गोधाजी गायकवाडसह १५ जणांविरुद्ध भादंवि १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिवरंग नवीन गावठाण येथे यावर्षी १२ लाख रुपये खर्च करून नळयोजना कार्यान्वित करण्यात आली. परंतु विहिरीला दोन महिन्यांपासून पाणी नाही, म्हणून ग्रामपंचायतीने झाडगाव ता.उमरखेड येथील रुस्तम शिंदे यांच्या शेतातील बोअरवेल अधिग्रहीत केली. या ठिकाणावरून स्प्रिंकलरचे पाईप टाकून पाणी घेण्यात येत होते. शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास विनोद शामराव गायकवाड पाणी भरण्यासाठी आला असता विलास जगदाडे याचा त्यांच्याशी वाद झाला. हा वाद वाढत गेल्याने दोन गट समोरासमोर आले. त्यातून त्यांच्यात हाणामारी झाली. यात महिलेसह तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेडला उपचार सुरू आहे. पोफाळीचे ठाणेदार सरदारसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनात जमादार रमेश इंगोले, शिपाई संजय चव्हाण तपास करीत आहे. मारहाणीच्या या घटनेमुळे ग्रामीण भागात पाणीटंचाई पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहे. (वार्ताहर)