एसटीवर लक्ष्मी प्रसन्न, दिवाळीच्या दहा दिवसात २१८ कोटींचे उत्पन्न
By विलास गावंडे | Published: November 3, 2022 03:21 PM2022-11-03T15:21:01+5:302022-11-03T15:22:46+5:30
सरासरी सात कोटीने वाढ : ३१ ऑक्टोबरला २६ कोटी रुपयांची कमाई
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) वैश्विक महामारी कोरोनामुळे तब्बल दोन वर्षे गटांगळ्या खाल्ल्या. या काळात सरकारने उधारी चुकती करून महामंडळाला सावरले. यानंतर काही काळातच कर्मचाऱ्यांचा पाच महिने संप चालला. लालपरीची आर्थिक स्थिती त्यामुळे आणखी खराब झाली. मात्र, या दिवाळीत एसटीवर लक्ष्मी प्रसन्न झाली. केवळ दहा दिवसांत २१८ कोटी ३३ लाख रुपयांचे उत्पन्न महामंडळाला मिळाले.
बसचा तुटवडा असतानाही एसटीचे दहा दिवसात दैनंदिन सरासरी उत्पन्न २० कोटी रुपयांच्या घरात राहिले. दिवाळीपूर्वी ते १३ कोटी रुपये होते. सरासरी सात कोटीने त्यात वाढ राहिली. पूर्वी महामंडळाकडे १६ हजार ५०० बसगाड्या होत्या. आता ही संख्या १३ हजार ८०० इतकी खाली आली आहे. मात्र, तुटवड्यानंतरही जादा बसेस सोडण्याचे कसब महामंडळाने दाखवले. प्रवासी संख्या वाढताच करण्यात आलेल्या नियोजनाचा फायदा उत्पन्न वाढण्यात झाला.
३१ ऑक्टोबर या एकाच दिवशी २५ कोटी ३३ लाख रुपये एवढे उत्पन्न एसटीने मिळवले. मागील दहा वर्षांतील एक दिवसाची ही उच्चांकी कमाई असल्याचे सांगितले जाते. उत्पन्नाची बाजू कमकुवत असल्याने महामंडळाला सरकारवर विसंबून राहावे लागत आहे. डिझेल भरून बस चालविण्याइतकेही उत्पन्न काही आगारांतून निघत नाही. यास्थितीत दिवाळीत झालेली उत्पन्नातील वाढ दिलासा देणारी आहे.
तीन कोटी प्रवासी
दिवाळीच्या दहा दिवसात राज्यात तीन कोटी १८ लाख ६० हजार नागरिकांनी लालपरीने प्रवास केला. प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी, यासाठी महामंडळाने दिवाळीपूर्वी परिपत्रकातून विविध सूचना केल्या होत्या. बस आतून-बाहेरून स्वच्छ ठेवा, ब्रेकडाऊन होतील अशा बसेस मार्गावर पाठवू नका, बसमधील सर्व सीट उत्तम असल्याची खात्री करून घ्या आदी खबरदारीच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यांची अंमलबजावणी अपवादानेच झाली. यानंतरही नागरिकांनी एसटीला पसंती दिली.
धुळे विभाग प्रथम
दिवाळीत २१ ते ३१ ऑक्टोबर या दहा दिवसात सर्वाधिक उत्पन्न मिळविण्यात धुळे विभाग पहिल्या स्थानी राहिला. या विभागाने ११ कोटी ४१ लाख रुपयांची कमाई करून महामंडळाच्या तिजोरीत भर टाकली. जळगाव विभाग ११ कोटी ३२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दुसऱ्या स्थानी आहे. कोल्हापूर विभागाने १० कोटी ६४ लाखांचे उत्पन्न घेत तिसरे स्थान प्राप्त केले.