एसटीची प्रवासी मर्यादा ‘अनलॉक’; पूर्ण क्षमतेने वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 07:06 PM2020-09-18T19:06:46+5:302020-09-18T19:07:07+5:30
कर्नाटक व गुजरात राज्यात यापूर्वीच पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रात परवानगदी देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाच्या भीतीने लोकवाहिनीतून ५० टक्केच प्रवासी वाहतूक सुरू होती. आता धोका संपला नसली तरी, नाईलाजाने का होईना शुक्रवारपासून पूर्ण क्षमतेने प्रवासी घेऊन एसटी बसेस मार्गावर धावत आहे. राज्यातील विविध मार्गावर पाच हजारावर बसेस प्रवाशांना सेवा देत आहे.
एसटीने प्रवासी वाहतुकीला शासनाने २० ऑगस्टपासून परवानगी दिली. ५० टक्के प्रवासी घेऊन, सोशल डिस्टन्सिंग पाळून, बसेस सॅनिटायझर करून प्रवासी वाहतुकीला मुभा देण्यात आली होती. ५० टक्के प्रवासी घेऊन होणारी वाहतूक आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने महामंडळाने पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीची मुभा मिळावी, अशी मागणी शासनाकडे केली. याला होकार देण्यात आला आहे. कर्नाटक व गुजरात राज्यात यापूर्वीच पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रात परवानगदी देण्यात आली आहे.
बसेसचे निर्जंतुकीकरण, प्रत्येक प्रवाशाने तोंडला मास्क बांधणे आवश्यक अशा अटींवर ही परवानगी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत दिवसभरात राज्यभरातील विविध मार्गावर पाच हजार बसेस धावत आहेत. या माध्यमातून पाच ते लाख लोकांची वाहतूक होत आहे. महामंडळाकडे १८ हजार बसेस आहेत. प्रवासी संख्या वाढल्यानंतर या सर्व बसेस मार्गावर धावताना दिसणार आहे.
५० टक्के प्रवासी क्षमतेने होणाऱ्या वाहतुकीमुळे महामंडळाला आर्थिक फटका बसत होता. पहिली बस ५० टक्के प्रवाशांना घेऊन प्रवासाला निघाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या प्रवाशांकरिता दुसरी बस सोडावी लागत होती. यामध्ये प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागण्यासोबतच एसटीचा खर्चही वाढत होता. आंतरजिल्हा वाहतूक आणि ई-पासचा प्रश्न निकाली निघाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढली आहे.
पगार केव्हा देता, कर्मचाऱ्यांचा प्रश्न
जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचा पगार झाला नाही. घर चालवायचे कसे, हा एसटी कर्मचाºयांचा प्रश्न आहे. महामंडळाने आर्थिक मदतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. प्रत्येक प्रगारासाठी शासनापुढे हात पसरवावे लागत आहे. शासनाच्या आदेशानेच ५० टक्के वाहतूक सुरू करण्यात आली होती. यात एसटीचे नुकसान झाले. म्हणून शासनाने भरपाई द्यावी, अशी कर्मचाºयांची मागणी आहे. दरम्यान, कोरोना संपेपर्यंत शासनाने महामंडळाला दरमहा ४०० कोटींची आर्थिक मदत करावी, असे निवेदन एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, अध्यक्ष संदीप शिंदे यांनी शासनाला दिले आहे.