राज्यातील आदिवासी तरुणी सांभाळणार आता ‘एसटी’चे स्टेअरिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:38 PM2018-01-24T12:38:11+5:302018-01-24T12:41:38+5:30
जिल्ह्यात डोंगरदऱ्यांच्या पायथ्याशी आडवळणावरील पोडावर राहणाऱ्या आदिवासी तरुणी लवकरच ‘एसटी’ बस चालविताना दिसणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात डोंगरदऱ्यांच्या पायथ्याशी आडवळणावरील पोडावर राहणाऱ्या आदिवासी तरुणी लवकरच ‘एसटी’ बस चालविताना दिसणार आहे. मुंबई येथे रविवारी झालेल्या कार्यक्रमात २३ तरुणींना बसचालकपदी विराजमान करण्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा 'राष्ट्र कृतज्ञता दिवस' रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, ना. विष्णू सावरा, ना. संजय राठोड आदींच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी तरुणी, महिलांना एसटी चालक म्हणून नियुक्ती दिली.
आदिवासी मुली गाव, पोड, घराबाहेर पडाव्या म्हणून एसटी महामंडळात चालक म्हणून नियुक्ती देण्याची संकल्पना ना. संजय राठोड यांनी ना. दिवाकर रावते यांच्यासमोर मांडली. यवतमाळ जिल्ह्यापासूनच या उपक्रमाची सुरवात करू असे सांगत कामाला लागण्याचे आदेश ना. राठोड यांना दिले. शैक्षणिक पात्रता पडताळून तरुणींना या उपक्रमासाठी निवडण्यात आले. मुंबई येथील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांना रवाना केले. मुंबईतील सोहळ्यात या २३ तरुणींना वाजतगाजत मंचावर आणून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. एप्रिलपासून प्रशिक्षण सुरू होऊन या तरुणी दिवाळीपर्यंत बसेसच्या स्टेअरिंगवर प्रत्यक्ष दिसणार असल्याचे ना. रावते यांनी यावेळी सांगितले.
मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी समाजातील तरुणींना थेट चालक पदासाठी निवडून ना. संजय राठोड यांनी आम्हाला पोडावरून थेट विकासाच्या महामार्गावर आणले, अशी प्रतिक्रिया या प्रक्रियेतील तरुणी अंजुताचे वडील इलाहाबाद भोसले यांनी दिली. परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि ना. संजय राठोड यांनी एसटीचे स्टेअरिंग आमच्या हाती देण्याचा निर्णय घेऊन मोठा विश्वास टाकला, तो सार्थ ठरवू, अशी प्रतिक्रिया शीतल रमेश पवार या तरुणीने व्यक्त केली.