नेर येथील शासकीय वसतिगृहातून विद्यार्थी बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 09:46 PM2019-04-26T21:46:26+5:302019-04-26T21:46:54+5:30
येथील शासकीय वसतिगृहाचा विद्यार्थी गेली पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याने या वसतिगृहाचा बेताल कारभार चव्हाट्यावर आणला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : येथील शासकीय वसतिगृहाचा विद्यार्थी गेली पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याने या वसतिगृहाचा बेताल कारभार चव्हाट्यावर आणला होता.
तालुक्याच्या खरडगाव येथील रहिवासी असलेला पवन नंदकिशोर टाके हा विद्यार्थी येथील दारव्हा रोडवर असलेल्या शासकीय वसतिगृहात राहून बी.कॉम.चे शिक्षण घेत आहे. पाच दिवसांपासून तो वसतिगृहात नाही. गृहपालाने या प्रकाराची माहिती पवनच्या पालकांना तीन दिवसानंतर दिली. दरम्यान, पवनचा मोबाईलही स्विच आॅफ असल्याचे सांगितले जाते. शोध लागत नसल्याने पवनचे वडील नंदकिशोर आणि गृहपालांनी शुक्रवारी पोलिसात तक्रार नोंदविली.
समाज कल्याण अंतर्गत असलेल्या या वसतिगृहात विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण दिले जाते, बाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो आदी प्रकारच्या तक्रारी पवनने वरिष्ठांकडे केल्या होत्या. शिवाय विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न तो निकाली काढत होता. तो अचानक बेपत्ता झाल्याने अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.