भरपावसात घरासमोरच्या नालीने केला घात; पुरात वाहून गेला शाळकरी विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2022 03:02 PM2022-07-19T15:02:24+5:302022-07-19T15:07:51+5:30
नव्या रेनकोटमुळे खुशीत सकाळीच तो शाळेला निघाला, पण जोरदार पाऊस सुरू असल्याने शाळेला सुटी असल्याचे त्याला सांगण्यात आले. तो परत घराकडे निघाला अन् वाटेतच घडले विपरीत.
यवतमाळ : आईने आणलेला नवा रेनकोट घालून पाचव्या वर्गातील चिमुकल्याने भरपावसात शाळा गाठली. कुटुंबातील सर्वांनीच त्याला पावसात शाळेत जाऊ नको, असे बजावले. मात्र, उत्साहाच्या भरात तो चिमुकला रेनकोट घालून शाळेत पोहोचला. जोरदार पाऊस सुरू असल्याने शाळांंना सुटी देण्यात आली. निराश होऊन घरी येत असताना त्याचा घात झाला. घराजवळच्या नालीत तो पडला. तेथेच रपट्याखाली अडकल्याने बुडून मृत्यू झाला. ही मन हेलावणारी घटना यवतमाळातील मुलकी परिसरात घडली.
जय शंकर गायकवाड (वय ११, रा. मुंगसाजीनगर मुलकी) असे मृत बालकाचे नाव आहे. जय हा त्याची आई व मोठ्या बहिणीसह आजोबांकडे राहत होता. जयचे वडील काही महिन्यांपूर्वीच आजारपणात दगावले. तेव्हापासून जयची आई दोन मुलांना घेऊन वडिलांकडे मुंगसाजीनगर परिसरात राहत होती. उमरसरा भागातील शाळेत जय इयत्ता पाचवीला होता. यंदाच्या पावसाळ्यात त्याच्याकडे रेनकोट नसल्याने अडचण होत होती. आईने दोन दिवसांपूर्वी जयला नवीन रेनकोट घेऊन दिला. दोन दिवस पाऊस नसल्याने रेनकोट घालता आला नाही.
रविवारी रात्रीपासूनच जोरदार पाऊस शहरात बरसत होता. जयला सोमवारी सकाळी उठल्या बरोबर पाऊस दिसला. तशी त्याने शाळेत जाण्याची तयारी केली. यावेळी त्याला आईने पावसात शाळेत जाऊ नको, इतक्या पावसात शाळा भरणार नाही, असेही सांगितले. मात्र, नवीन रेनकोट घालून शाळेत जाण्याचा हट्ट जयने केला. तो घरूनच रेनकोट घालून पायदळ शाळेकडे निघाला. सकाळी ७ वाजता शाळेत जाण्यासाठी निघाला. शाळेत पोहोचल्यानंतर शाळेला सुटी असल्याचे त्याला सांगण्यात आले. तो परत आला.
नालीच्या काठीने येत असताना ८.३० वाजताच्या सुमारास घराजवळच अडीच फूट रुंद नालीत पाय घसरून पडला. पाण्याच्या प्रवाहाने तो वाहत जाऊन एका रपट्यात अडकला. हा प्रकार परिसरातील नागिरकांच्या लक्षात येताच त्यांनी जयला वाचविण्यासाठी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. जयला तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. नालीतील पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने जयच्या फुप्फुसात पाणी शिरले होते. यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोक व्यक्त होत आहे.
महसूल प्रशासनाकडून मदतीचा हात
घटनेची माहिती मिळताच यवतमाळचे तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी मुलकी परिसरातील घटनास्थळाला भेट दिली. गायकवाड कुटुंबीयांचे सांत्वन केले. पूरपीडित म्हणून मदतीचा हात देणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जवळपास चार लाखांपर्यंतची मदत गायकवाड कुटुंबाला दिली जाणार आहे.