करळगावात प्रेमप्रकरणातून विद्यार्थिनीची आत्महत्या
By admin | Published: January 15, 2015 10:59 PM2015-01-15T22:59:28+5:302015-01-15T22:59:28+5:30
लग्नाचे आमिष देत गावातीलच तरूणाने एका सोळावर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. शारीरिक शोषण केल्यानंतर त्याने चक्क लग्नास नकार दिला. त्यामुळे व्यथित
यवतमाळ : लग्नाचे आमिष देत गावातीलच तरूणाने एका सोळावर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. शारीरिक शोषण केल्यानंतर त्याने चक्क लग्नास नकार दिला. त्यामुळे व्यथित झालेल्या एका विद्यार्थिनीने विषारी द्रव्य प्राशन केले. गुरूवारी येथील शासकीय रूग्णालयात तिचा मृत्यू झाला. ही गंभीर घटना तालुक्यातील करळगाव येथे घडली.
श्वेता असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून करळगावची रहिवासी होती. बाभूळगाव तालुक्यातील चिमणाबागापूर येथील एका कनिष्ठ महाविद्यालयातील ११ व्या वर्गात ती शिकत होती. गावातीलच अरविंद नामक तरूणाने तिला आपल्या जाळ्यात ओढले. भूलथापा आणि लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केले. त्यानंतर मात्र तो श्वेताला टाळत होता. तिने विचारणा केल्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती तणावात होती. त्यामुळे आई-वडीलांनी तिला विचारणा केली. तेव्हा खरा प्रकार उघड झाला. मात्र बदनामीच्या भीतीने त्यांनी हा प्रकार उघड केला नाही.
दरम्यान अरविंदने श्वेताला त्रास देणे सुरू केले. या त्रासाला कंटाळून तिने ११ जानेवारीला दुपारी कुटुंबिय शेतात गेले असता घरीच विष प्राशन केले. हा प्रकार लहान बहिणीच्या लक्षात आला. त्यानंतर यवतमाळच्या शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
पाच दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास श्वेताचा मृत्यू झाल्याची माहिती श्वेताच्या वडिलांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. याप्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी तूर्तास अकस्मात घटनेची नोंद घेतली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)