विद्यार्थ्याचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 11:41 PM2019-12-03T23:41:58+5:302019-12-03T23:42:51+5:30
संतोष शंकर डांगे (१४) रा. लासीना ता. जि. हिंगोली असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे तो शाळेत गेला होता. मात्र सायंकाळी घरी परतला नाही. त्याचे वडील व नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र संतोष कुठेही आढळला नाही. त्यामुळे त्यांनी रात्री मराठवाड्यातील कळमनुरी पोलीस ठाण्यात संतोषचे अपहरण झाल्याची तक्रार दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुळावा : उमरखेड तालुक्यातील झाडगाव शिवारात एका विद्यार्थ्याचा खून करून त्याचा मृतदेह जमिनीत पुरण्यात आला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
संतोष शंकर डांगे (१४) रा. लासीना ता. जि. हिंगोली असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे तो शाळेत गेला होता. मात्र सायंकाळी घरी परतला नाही. त्याचे वडील व नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र संतोष कुठेही आढळला नाही. त्यामुळे त्यांनी रात्री मराठवाड्यातील कळमनुरी पोलीस ठाण्यात संतोषचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. दरम्यान रात्रभर त्याचा शोध घेण्यात आला. मात्र मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास मुळावा लगतच्या झाडगाव-भांबरखेडा शिवारात त्याचा पुरलेल्या अवस्थेतील मृतदेहच आढळून आला. मुळावा ते हिंगोली हे अंतर केवळ ५० किलोमीटर आहे.
मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास झाडगाव ग्रामस्थांना गावालगत अर्धवट स्थितीत पुरलेला मृतदेह आढळला. तेथील पोलीस पाटील वसंतराव देशमुख यांनी लगेच पोफाळी पोलिसांना माहिती दिली. पोफाळीचे ठाणेदार कैलास भगत यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळ गाठले. त्यांनी अर्धवट स्थितीत पुरलेला संतोषचा मृतदेह बाहेर काढला. काही अंतरावर एक स्कूल बॅग आढळली. त्यामधील ओळखपत्रावरून मृताची ओळख पटली. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी विकास तोटावार, एलसीबी प्रमुख प्रदीप शिरस्कार यांनी भेट दिली.
यवतमाळ येथील श्वान पथक पाचारण करण्यात आले. मात्र या पथकाला आरोपीचा माग काढण्यात यश आले नाही. या प्रकरणी पोफाळी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खून आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला.
सुपारी घेऊन खून केल्याचा संशय
या खून प्रकरणातील आरोपी गुन्हेगार असून संख्येने ते तीन ते चार असावे, असा संशय पोफाळी पोलिसांनी व्यक्त केला. आरोपींनी खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यामुळे हा संशय बळावला आहे. ठाणेदार कैलास भगत यांच्यासह संतोष हराळ, नाना म्हस्के, विजय जाधव, देविदास लांडगे, अमोल कानेकर, राहुल मडावी यांनी हा गुन्हा उघडकीस आणला. पुढील तपासाकरिता हे प्रकरण कळमनुरी पोलिसांना हस्तांतरित केले जाणार असल्याची माहिती ठाणेदार भगत यांनी दिली. संतोषच्या खुनाचे रहस्य मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.