चिमुकल्यांनी सीइओंच्या कक्षात भरविला वर्ग; तासाभराच्या चर्चेनंतर शिक्षकाची तातडीने नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2022 03:03 PM2022-09-30T15:03:11+5:302022-09-30T15:31:45+5:30
पालकांनी सरळ जिल्हा परिषदेवर धडक देत थेट सीईओंच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले.
यवतमाळ : वर्षानुवर्षे शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वारंवार मागणी करूनही शिक्षकांची नेमणूक होत नसल्याने अखेर गुरुवारी शाळेतील संपूर्ण विद्यार्थी आणि पालकांनी सरळ जिल्हा परिषदेवर धडक देत थेट सीईओंच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले. तासाभराच्या चर्चेनंतर अखेर या विद्यार्थ्यांसाठी तातडीने एका शिक्षकाची नियुक्ती करण्याचे लेखी आदेश सीईओंनी काढले.
पुसद तालुक्यातील मारवाडी खुर्द या गावातील जिल्हा परिषद शाळेला गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांची कमतरता भेडसावत आहे. या शाळेत २०१८ पासून एकमेव शिक्षक कार्यरत होते. त्यांचीही आता आंतरजिल्हा बदली झाली आहे. त्यामुळे गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. याबाबत पुसद पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रशासनाला वारंवार मागणी करून शिक्षक देण्याबाबत दुर्लक्ष केले जात होते. अखेर मारवाडी गावातील संपूर्ण पालकांनी गुरुवारी मुलांना सोबत घेऊन यवतमाळ गाठले व जिल्हा परिषदेत आंदोलन केले.
सीईओंच्या कक्षात विद्यार्थी व पालक ठाण मांडून बसल्याने मोठा गोंधळ उडाला. अखेर सीईओ डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांनी संपूर्ण परिस्थिती जाणून घेतल्यानंतर मारवाडीच्या शाळेवर एका शिक्षकाची तातडीने नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या शाळेवर पुसद पंचायत समितीमधीलच हनवतखेडा गावातील शिक्षक श्रावण चव्हाण यांना मारवाडीच्या शाळेत सेवा बजावण्याबाबत सीइओंनी लेखी आदेश काढला.
अनेक शाळांची परिस्थिती गंभीर
मारवाडी गावाप्रमाणेच पुसद, महागाव, उमरखेड, झरी, मारेगाव, घाटंजी तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये अपुऱ्या शिक्षकांच्या खांद्यावर चार-चार वर्गांचा भार टाकण्यात आला आहे. एकीकडे शासन रिक्त जागा भरण्याची परवानगी देत नाही. तर दुसरीकडे बदली प्रक्रियेत शिक्षक शहरालगतची गावे निवडून जात आहेत. त्यामुळे दुर्गम गावात व तालुका मुख्यालयापासून दूर असलेल्या गावात शिक्षकांचा तुटवडा आहे.