विदर्भ-मराठवाड्यातील मुलांना शिक्षणासाठी करावा लागतो जीवघेणा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 01:42 PM2019-09-17T13:42:31+5:302019-09-17T13:46:35+5:30
विदर्भ आणि मराठवाड्याला वेगळे करणारी पैनगंगा नदी यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते
अविनाश खंदारे
उमरखेड (यवतमाळ) - प्रशासनातील अधिकाऱ्यांची, सत्तेतील नेत्यांची मुलं ड्रायव्हरला सोबत घेऊन पॉश कारमधून शाळेत जातात. तरी ती मुलं घरी परतेपर्यंत या श्रीमंत पालकांचा जीव थाऱ्यावर नसतो. तर त्याचवेळी काही खेड्यातील मुलं चक्क जीव धोक्यात घालून दुथडी भरलेली नदी ओलांडून शाळेत पोहोचतात.
गोरगरिबांच्या शिक्षणाचाखेळखंडोबा सुरू आहे. शिक्षणाची ही थरारक घटना विदर्भ-मराठवाड्याच्या सीमावर्ती गावातील आहे. नांदेड जिल्ह्यातील दिघी आणि इतर तीन-चार गावात फक्त प्राथमिक शिक्षणाची सोय आहे. उच्च प्राथमिक शिक्षणासाठी तेथील चिमुकल्यांना यवतमाळ जिल्ह्यातील चातारी (ता. उमरखेड) गावातील शाळेत यावे लागते. दिघीच नव्हेतर वीरसनी, वाघी, टेंभुर्णी, घारापूर, खडकी, जवळगाव या गावातील विद्यार्थ्यांनाही चातारीच्या शाळेत आल्याविना पर्याय नाही. साध्या प्राथमिक शिक्षणासाठी दररोज परगावी पायी जाणाऱ्या या पोरा-पोरींसाठी शासनाने रस्ताही दिला नाही. वाहतुकीची साधनेही उपलब्ध करून दिली नाही. पण या गरिबांच्या शिक्षणात याहीपेक्षा मोठा अडथळा आहे, तो प्रचंड विस्तारीत पात्र असलेल्या पैनगंगा नदीचा.
विदर्भ आणि मराठवाड्याला वेगळे करणारी पैनगंगा नदी यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते. हेच नदीपात्र दिघी परिसरातून चातारीला येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही वाट अडविते. कारण या नदीवर पूलच बांधण्यात आलेला नाही. विद्यार्थी नदीपर्यंत काही किलोमीटर पायी येतात. नदीजवळ आल्यावर रूखात (अगदी छोटी लाकडी नाव) बसतात. वाहत्या वेगवान पाण्याचे हेलकावे खात हळूहळू पैलतिरी पोहोचतात. नदी कशीबशी ओलांडल्यावर पुन्हा पायी चालत चातारीतल्या शाळेपर्यंत पोहोचतात. पण संततधार पाऊस असला तर या रुखातून प्रवास अशक्य होतो. अनेकदा शाळेत गैरहजेरी लागते.
रुखात बसून प्रवास करणे म्हणजे, जीवावरची जोखीम. ही छोटी बोट कधी उलटेल अन् कधी जीव जाईल याचा नेम नाही. त्यामुळे नदीपात्रावर पूल बांधण्याची मागणी गेल्या 30 वर्षांपासून केली जात आहे. मात्र ना पूल झाला ना दिघी परिसरात शाळा झाल्या. गोरगरिबांच्या शिक्षणाच्या बाबतीत आणि जीवनाच्याही बाबतीत लोकप्रतिनिधी, प्रशासन उदासीन आहे.
गरिबी आणि शिक्षणात ‘सेतू’ बांधा
सकाळी मुलांना ‘रेडी’ करून पालक त्यांना शाळेत पोहोचविण्यासाठी धडपडतात. स्वत:ची कार, दुचाकी तेही नसेल तर स्कूलबसमधून गावातल्या गावात प्रवास करणाऱ्या या पोरांबाबत आईबाबांच्या मनात प्रचंड काळजी असते. मुल घरी परतेपर्यंत चिंता कायम असते. पण याच महाराष्ट्रातल्या काही खेड्यातली मुले जंगल, नदी ओलांडून पालकांशिवाय एकटेच परगावातील शाळेत जातात. घरातून पायी निघणाºया या पोरांसाठी धड रस्ताही नाही. बरं कोटे-गोटे तुडवित जाणाऱ्या या मुलांची वाट पुन्हा अडविते ती दुथडी भरून वाहणारी पैनगंगा नदी. माणसाच्या उंचीएवढे पाणी असलेली नदी ओलांडण्यासाठी पूलही नाही. रुखातून जाताना कधीही नदीत बुडण्याची भीती असते. ग्रामीण विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्याचा दावा शासन सातत्याने करीत असते. पण दुसरीकडे खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना अक्षरश: जीवावर उदार होऊन शाळेपर्यंत पोहोचावे लागत आहे. गोरगरिबांची मुले आणि दर्जेदार शिक्षण ही दोन टोके जोडण्यात शासनाला अद्यापही यश आलेले नाही.