विद्यार्थ्यांना चार वर्षांपासून शिष्यवृत्तीच मिळाली नाही
By admin | Published: September 24, 2015 03:06 AM2015-09-24T03:06:21+5:302015-09-24T03:06:21+5:30
मोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार आहे. या सोबतच गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ही दिली जाते.
किशोर वंजारी नेर
मोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार आहे. या सोबतच गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ही दिली जाते. विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीमध्ये ‘आम आदमी शिष्यवृत्ती’चाही समावेश आहे. मात्र गेली चार वर्षांपासून तालुक्यातील एकाही विद्यार्थ्याला या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नाही. यात सावळा गोंधळ असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी दस्तावेज तयार करण्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. परंतु गेली चार वर्षात विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली नाही.
महाराष्ट्र शासनातर्फे भारत सरकार शिष्यवृत्ती, छत्रपती शाहू, सावित्रीबाई फुले, अल्पसंख्यक, सुवर्ण जयंती, आम आदमी, आर्थिक दुर्बल आम आदमी आदी प्रकारची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दिली जाते. मात्र यात कमालीची अनियमितता आली आहे. शाळांना मिळालेल्या शिष्यवृत्तीचा धनादेश वठवून निधी शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो किंवा मुख्याध्यापक शाळेमार्फत वितरण करतात. मात्र यात गैरप्रकार होत असल्याचे दिसून येत आहे.
काही शाळांमध्ये बोगस स्वाक्षऱ्या करून विद्यार्थ्यांच्या नावाची शिष्यवृत्ती हडप केली जात आहे. काही शाळा थकीत फी, शाळेच्या कार्यक्रमासाठीचा निधी यासाठीही शिष्यवृत्तीमधून रक्कम कपात करत आहे. शिवाय तीन हजार रुपये शिष्यवृत्ती असेल तर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये देण्याचेही प्रकार घडत आहे. मात्र विद्यार्थी धाकापोटी तीन हजार रुपयांच्यावरच स्वाक्षरी करीत असल्याच्या बाबी पुढे येत आहे. यात काही शिक्षक आणि संस्थाचालकही गुंतले असल्याची माहिती आहे.
विद्यार्थ्यांना आतापर्यंत वाटप झालेल्या रकमेची चौकशी झाल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. चार वर्षांपूर्वी शासनाने पाच एकर शेती आणि भूमिहीन कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी आम आदमी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. वर्षाकाठी सहा हजार रुपये विद्यार्थ्यांना मिळतात. यासाठी विद्यार्थी दरवर्षी अर्ज भरतात. परंतु गेली चार वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या खात्यात ही रक्कमच जमा झाली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे. शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी प्रयत्नाची मागणी आहे.