विद्यार्थ्यांनी अनुभवले ग्रामीण जीवन
By Admin | Published: September 15, 2015 05:19 AM2015-09-15T05:19:26+5:302015-09-15T05:19:26+5:30
आधुनिक काळात शहरी मुलांची मातीशी नाळ तुटत चालली आहे. त्यामुळे मूल्य शिक्षणाचाही अपेक्षित परिणाम
यवतमाळ : आधुनिक काळात शहरी मुलांची मातीशी नाळ तुटत चालली आहे. त्यामुळे मूल्य शिक्षणाचाही अपेक्षित परिणाम साधला जात नाही. हा धोका ओळखून यवतमाळ पब्लिक स्कूलने विद्यार्थ्यांना थेट ग्रामीण जीवनशैलीची ओळख करून दिली. बाभूळगाव तालुक्यातील महमदपूर या आदर्श गावाला भेट देण्यात आली.
शैक्षणिक उपक्रमाचा भाग म्हणून या शाळेतर्फे विविध कार्यक्रम घेतले जातात. याचाच एक भाग म्हणून पॅरेन्टस् कौन्सिलतर्फे वर्ग तीन आणि सहाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. महमदपूर येथे सुभाषचंद्र आचलिया यांनी या गावाविषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. हे गाव विविध दहा पुरस्कारांनी सन्मानित आहे, ही गौरवाची बाब सांगण्यात आली. ऊस, संत्रा, केळी, सोयाबीन, कापूस आदी पिकांची शेती दाखवून उत्पादन कसे घेतले जाते, त्याची विक्री कोठे केली जाते, शेतकऱ्यांचा यात किती फायदा असतो आदी बाबी सांगण्यात आल्या. शिवाय ग्रामीण भागातील लोकांचा व्यवसाय, त्यांच्या उदरनिर्वाहांची साधने या विषयीची माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांसाठी दहीहांडीचा कार्यक्रमही या निमित्त घेण्यात आला. यात त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आनंद लुटला. या उपक्रमाचे आयोजन आणि नियोजन शाळेचे समन्वयक यश बोरुंदिया यांचे होते. पॅरेन्टस् कौन्सिलच्या अध्यक्ष सुरूची खरे, सहसचिव साक्षी सिंधी, सदस्य बुरटकर यांचे मोठे योगदान या उपक्रमासाठी लाभले. शाळेच्या छाया गुजर, स्मिता मिश्रा, मंजू साहू, अर्चना निनगुरकर, पूनम देशमुख, विद्या राजगिरे, अमोल क्षीरसागर यांचेही त्यांना सहकार्य लाभले. या उपक्रमाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास यांनी आयोजकांचे कौतुक केले. (वार्ताहर)