विद्यार्थी धडकले जिल्हा कचेरीवर
By admin | Published: July 30, 2016 12:46 AM2016-07-30T00:46:47+5:302016-07-30T00:46:47+5:30
शिवाजीनगरमधील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनींना न्याय मिळवून देण्यासाठी शुक्रवारी बिरसा ब्रिगेडच्या नेतृत्वात...
वसतिगृहातील समस्या : मागण्या पूर्ण करण्याची मागणी
यवतमाळ : शिवाजीनगरमधील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनींना न्याय मिळवून देण्यासाठी शुक्रवारी बिरसा ब्रिगेडच्या नेतृत्वात आदिवासी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मोर्चेकऱ्यांनी घोषणबाजी करीत विद्यार्थिनींना सुरू केलेल्या उपोषणाची तड लावण्याची मागणी केली.
शिवाजीनगर परिसरातील शासकीय वसतिगृहातील निकृष्ट दर्जाचे जेवण आणि गृहपाल व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची मागणी करीत विद्यार्थिनींनी बुधवारपासून उपोषणाला सुरूवात केली. वसतिगृहाच्या प्रवेशव्दारासमोरच विद्यार्थिनी उपोषणाला बसल्या आहेत. जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचे मिळत असून त्यात सुधारणा करावी, भोजन कंत्राटदार बदलावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. तसेच गृहपाल आणि कर्मचाऱ्यांची बदली करावी, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे, निवासी गृहपालाची नियुक्ती करावी, आदी मागण्या त्यांनी केल्या. वसतिगृहातील कर्मचारी शिवीगाळ करतात, असा त्यांचा आरोप आहे.
विद्यार्थिनी समस्या घेऊन गृहपालांकडे गेल्यास प्रवेश रद्द करण्याची धमकी दिली जाते, निकृष्ट जेवणामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतो, असा दावा विद्यार्थिनींनी केला. एकाच खोलीत १३ ते १४ मुलींना राहावे लागते, वसतिगृह स्वच्छ ठेवले जात नाही, कर्मचारी स्वत:ची कामे सांगतात, भत्ता व्यवस्थित दिला जात नाही, आदी आरोप उपोषणकर्त्या विद्यार्थिनींनी केले. त्यांच्या उपोषणाची दखल घेत गुरूवारी पांढरकवडा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील विस्तार अधिकारी के.बी.पंधरे व डी.जे.उरकुडे यांनी यवतमाळ गाठून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क साधून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र विद्यार्थिनींनी आश्वासनावर न भाळता उपोषण सुरूच ठेवले आहे.
शुक्रवारी उपोषणस्थळी शहरातील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्रमांक एक, दोन व तिनचे विद्यार्थी गोळा झाले. यानंतर दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तेथे घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांपुढे कैफियत मांडली. प्रकल्प अधिकारी दीपककुमार मिना यांनी त्वरित सर्व समस्या सोडवाव्यात, अशी मागणी रेटली. मात्र अद्याप त्यांच्या मागण्या प्रलंबितच आहेत. (शहर प्रतिनिधी)
प्रकल्प अधिकारी मिना यवतमाळात
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास प्रकल्प अधिकारी मिना जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. यावेळी मोर्चेकरी विद्यार्थी महसूल भवनात बसून त्यांची वाट बघत होते. मात्र एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळे सर्व विद्यार्थी तेथून निघून आले, असे डॉ.अरविंद कुळमेथे यांनी सांगितले. दरम्यान, संबंधित पहिला पोलीस कर्मचाऱ्याची तक्रार करण्यासाठी सर्व विद्यार्थी पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.