विद्यार्थ्यांनी साकारली बँक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 10:10 PM2017-11-09T22:10:05+5:302017-11-09T22:10:19+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत गरिबीतून उच्च शिक्षण घेतले. आजही खेड्यापाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना पैशाविना शिकता येत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत गरिबीतून उच्च शिक्षण घेतले. आजही खेड्यापाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना पैशाविना शिकता येत नाही. त्यामुळेच बाबासाहेबांचीच प्रेरणा घेत गणेरीच्या विद्यार्थ्यांनी चक्क बँकच सुरू केली आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनी बँक’ सुरू करणाºया चिमुकल्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विद्यार्थी दिवसाचे औचित्य साधून बाभूळगाव तालुक्यातील गणोरी या गावातील मुलांनी बँक सुरू केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी शाळेत प्रवेश घेतला होता. हा दिवस सर्व शाळांमध्ये ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. केवळ भाषण, स्पर्धा असे उपक्रम राबविण्यापेक्षा गणोरीच्या जिल्हा परिषद शाळेने कृती केली. कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणासाठी पैशाची अडचण भासू नये, यासाठी विद्यार्थ्यांची बँक सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे, पहिल्याच दिवशी शाळेतील ५० विद्यार्थी या बँकेचे खातेदार झाले आहेत. शाळेची पटसंख्या दीडशे असून सर्व विद्यार्थी खातेदार व्हावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. शालेय उपक्रम, खरेदी अशा गोष्टींसाठी या बँकेतून विद्यार्थ्यांना मदत मिळेल.
चौथीची विद्यार्थिनी श्रावणी भितकर हिच्या हस्ते ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनी बँके’चे रितसर उद्घाटन करण्यात आले. ही बँक स्थापन करण्यासाठी मुख्याध्यापक अनिल नाईक, कल्पना डवले, सीमा मंगाम, प्रमोद गजभिये, वंदना राठोड, चंद्रबोधी घायवटे आदींनी पाठिंबा दिला.
बँकेचे काम दोन दिवस
गणोरीच्या शाळेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनी बँकेचे कामकाज आठवड्यातून दोन दिवस चालणार आहे. शुक्रवार हा बँकेत रक्कम डिपॉझिट करण्याचा दिवस असेल. तर सोमवार हा दिवस विड्रॉलसाठी ठेवण्यात आला आहे. गुरुवारी बाभूळगावचा बाजार असल्याने मजुरांना मजुरीचे पैसे मिळतात. त्यातील काही रक्कम मुले आपल्या बँकेत शुक्रवारी जमा करणार आहेत. अमन इंगोले, अन्वेश गोटे, मयूर मोकाशे हे विद्यार्थी बँकेचे कामकाज सांभाळणार आहे. या बँकेत केवळ दहाच्या पटीतील रकमा स्वीकारल्या जाणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.