अडगळीतल्या पुस्तकांशी जमली विद्यार्थ्यांची गट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 10:16 PM2019-04-28T22:16:01+5:302019-04-28T22:17:05+5:30
शाळेत अडगळीत पडलेल्या कपाटातील पुस्तकांसोबत विद्यार्थ्यांची पाहता-पाहता मैत्री झाली. दररोज फावल्या वेळात विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी वाचनालयात बसून विविध प्रकारची पुस्तकं चाळत बसतात. ही किमया बाभूळगाव तालुक्याच्या सावर येथील जिल्हा परिषद शाळेत घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शाळेत अडगळीत पडलेल्या कपाटातील पुस्तकांसोबत विद्यार्थ्यांची पाहता-पाहता मैत्री झाली. दररोज फावल्या वेळात विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी वाचनालयात बसून विविध प्रकारची पुस्तकं चाळत बसतात. ही किमया बाभूळगाव तालुक्याच्या सावर येथील जिल्हा परिषद शाळेत घडली. मुख्याध्यापिका संध्या दिलीप गरजे यांनी स्वखर्चातून वाढविलेले ग्रंथालय आज विद्यार्थ्यांना त्यांचे ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी यासाठी संध्या गरजे यांनी स्वखर्चातून शाळेत स्वामी विवेकानंद ग्रंथालय सुरू केले. शाळेत अडगळीत असलेल्या कपाटातील पुस्तके बाहेर काढली. त्याला अनेकांच्या देणगीतून खरेदी करण्यात आलेल्या पुस्तकांची जोड मिळाली. आज या ग्रंथालयामध्ये जवळपास एक हजार २२५ पुस्तके आहेत. वाचनालयाची रंगरंगोटी करण्यात आली. बसण्यासाठी मॅट उपलब्ध केली. विशेष म्हणजे, संध्या गरजे यांनी या कामासाठी पती दिलीप यांचाही आधार घेतला. शिवाय मैत्रिणीचाही मोठा हातभार त्यांना लागला. बजरंगजी वर्मा यांनी फ्लोरिंगसाठी दहा हजार रुपये दिले. शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, सदस्यांचाही वाटा या वाचनालय निर्मितीत राहिला. या कक्षाला स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र करण्याची मनीषा संध्या गरजे यांनी व्यक्त केली आहे.
छोटेखानी उद्घाटन सोहळा
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या वाचनालयाचा छोटेखानी उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी उपस्थितांकडून कौतुकाची थाप मिळाली. बाभूळगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मंगेश देशपांडे, शिक्षिका शीला राऊत, रजनी चातारकर, शारदा नागरगोजे, चंदा वाघमारे, संगीता शिंदे, ज्योती होटे, विलास मेश्राम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरीफ खाँ पठाण, साधन व्यक्ती प्रवीण घाडगे, कर्मचारी मनोहर केर, विकास भुसारी, प्रफुल्ल खसाळे, नीलेश परोपटे, अनिल संगेवार आदींचे प्रोत्साहन आणि सहकार्य लाभले.
सावरमध्ये दानदात्यांमुळे मिळाले बळ
‘गाव करी ते राव न करी’ असे म्हटले जाते. हीच म्हण सावर येथे सार्थ ठरली. गावातील अनेक दात्यांनी वाचनालय आणि विकासासाठी मदतीचे हात पुढे केले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचन खाद्य उपलब्ध झाले. विविध प्रकारच्या पुस्तकांमधून विद्यार्थी ज्ञानवृद्धी करीत आहे. मुख्याध्यापिका संध्या दिलीप गरजे यांचा यात सिंहाचा वाटा आहे.