रस्त्याच्या दैैनावस्थेने विद्यार्थ्यांचे हाल
By admin | Published: August 17, 2016 01:10 AM2016-08-17T01:10:38+5:302016-08-17T01:10:38+5:30
नांदेपेरा ते भुरकी रस्ता चिखलाने माखला असून ये-जा करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांना चिखल तुडवित जावे लागत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष : पावसामुळे वाहून गेले नाल्यावरील पुल
नांदेपेरा : नांदेपेरा ते भुरकी रस्ता चिखलाने माखला असून ये-जा करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांना चिखल तुडवित जावे लागत आहे. रस्त्यावर मुरूम, गिट्टी डांबर नसल्याने ग्रामस्थांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. मात्र प्रशासनाने यावर चुप्पी साधून बघ्याची भूमिका घेतल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
नांदेपेरा ते भुरकी रस्त्याबाबत लोकप्रतिनिधींनी आश्वासने दिली. मात्र ही आश्वासने हवेतच विरली आहे. याच मार्गाने विद्यार्थीसुद्धा शिक्षण घेण्यासाठी नांदेपेराला येतात. मात्र प्रशासनाला या रस्त्याने दळणवळण कमी होत असल्यामुळे या रस्त्याचे महत्व वाटत नाही. या रस्त्याने शेतकरीसुद्धा जात असून नांदेपेरा व भुरकी या गावातील अनेक ग्रामस्थांचे शेत रस्त्यालगत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात बि-बियाणे, खते, शेतीपयोगी अवजारे शेतात नेताना मोठी कसरत करावी लागते. गेल्या दोन वर्षापूर्वी याच मार्गावरील एका शेतात वीज कोसळली होती.
तेव्हा जखमींना त्वरित रूग्णालयात दाखल करता आले नाही. तसेच अनेक शेतकऱ्यांनी शेतात विष प्राशन केले. त्यांनासुद्धा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागला.
या रस्त्यावर कच्चे पुल निर्माण करण्यात आले होते. मात्र पावसाळा सुरू होताच हे पुल पूर्णपणे पाण्यात वाहून गेल्याने ये-जा करणाऱ्यांना साधे पायदळ जाता येत नाही. भुरकी येथील ग्रामस्थांचे बँक, शाळा, रास्तभाव दुकान, नांदेपेरा (पोहना) येथे असल्याने तेथे जावे लागते. त्यामुळे वृद्धांसह नागरिकांची चांगलीच परवड होत आहे. मात्र प्रशासनाला त्याची काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे.
स्वातंत्र्यानंतरही दोन गावाला जोडणारा रस्ता नसल्याची खंत ग्रामस्थांना वाटत आहे. रस्त्यावर मुरूम, गिट्टी तरी टाकून द्यावी, अशी मागणी दोन्ही गावातील ग्रामस्थ व नागरिक करीत आहे. (वार्ताहर)