इसापूरच्या विद्यार्थ्यांची पोलिसात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:10 AM2018-02-06T00:10:51+5:302018-02-06T00:11:13+5:30
तालुक्यातील इसापूर येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात गैरसोय होत असल्याने विद्यार्थ्यांनी सोमवारी थेट दिग्रस पोलीस ठाण्यात धाव घेतली.
आॅनलाईन लोकमत
दिग्रस : तालुक्यातील इसापूर येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात गैरसोय होत असल्याने विद्यार्थ्यांनी सोमवारी थेट दिग्रस पोलीस ठाण्यात धाव घेतली. वसतिगृहातील समस्या पोलिसांना सांगून या समस्या सोडविण्यासाठी विनंती केली.
दिग्रस तालुक्यातील इसापूर येथे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. या वसतिगृहात विद्यार्थ्यांना कोणत्याही सुविधा मिळत नाही. आंघोळ, पिण्यासह वापरण्यासाठी एकाच पाण्याच्या टाकीचा वापर करावा लागतो. परिणामी विद्यार्थ्यांना अशुद्ध पाणी प्यावे लागते. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वृत्तपत्रे आणि मासिक मिळत नाही. भोजनात अस्वच्छता असते. दुधातही भेसळ आढळून येते. १२ वीचे सत्र संपत आले तरी पुस्तके उपलब्ध झाली नाही. मासिक निर्वाह भत्ता वेळेवर मिळत नाही. चालू शैक्षणिक सत्रातील तसेच मागील वर्षातील क्रीडा साहित्य अद्यापही उपलब्ध झाले नाही. कोणत्याही विद्यार्थ्याचा विमा काढण्यात आला नाही. तसेच संगणकही हाताळायला मिळत नाही. वसतिगृहातील पंखेही नादुरुस्त आहे. याबाबी वारंवार सांगूनही कुणी लक्ष देत नसल्याने या विद्यार्थ्यांनी दिग्रस ठाण्यात धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक रणजित सिरसाट, वनदेव कापडे, गणेश मोरे यांना ही माहिती दिली. त्यांनी तत्काळ गृहपाल सुजित वाठोरे यांच्याशी संपर्क साधून समस्या दूर करण्यासाठी ठाण्यात बोलाविले.