विद्यार्थ्यांनो शाळा बनवा सुंदर, जिंका बक्षीस; थेट मुख्यमंत्र्यांचे आले पत्र !

By अविनाश साबापुरे | Published: January 11, 2024 08:23 PM2024-01-11T20:23:33+5:302024-01-11T20:24:26+5:30

४५ दिवसांचे विशेष अभियान : स्वच्छतेच्या कामाला मिळणार लाखमोलाचे बक्षीस

Students, make the school beautiful... a letter came directly from the Chief Minister! | विद्यार्थ्यांनो शाळा बनवा सुंदर, जिंका बक्षीस; थेट मुख्यमंत्र्यांचे आले पत्र !

विद्यार्थ्यांनो शाळा बनवा सुंदर, जिंका बक्षीस; थेट मुख्यमंत्र्यांचे आले पत्र !

यवतमाळ : मामाचे पत्र हरविले... हा खेळ जुन्या पिढीचा. पण सध्या जिल्ह्यातील शाळांमध्ये आलेल्या एका विशेष पत्राची मोठी चर्चा आहे. ते पत्र पाठविलेय थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी. शाळांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन प्रत्येक शाळा सुंदर व्हावी यासाठी ४५ दिवसांचे विशेष अभियान राबविले जात आहे. याच अभियानाला यशस्वी करण्याचे आवाहन करणारे हे पत्र आहे.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार, जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा... सुंदर शाळा’ हे अभियान १ जानेवारीपासून सुरू करण्यात आले आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत यात शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत. हेच अभियान विद्यार्थ्यांनी कसे यशस्वी करावे, याचे मार्गदर्शन-आवाहन करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक शाळेला पत्र पाठविले आहे. ‘बालभारती’मार्फत आलेल्या या पत्राच्या प्रती जिल्हा परिषदेने प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचविले असून त्याचे वाचन होत आहे. शिक्षक, पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांच्यात शाळेबाबत आदर व उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानात यशस्वी होणाऱ्या शाळांना राज्य शासनाकडून विविध पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. तालुकास्तरावरील प्रथम पारितोषिके तीन लाख रुपये, द्वितीय पारितोषिके दोन लाख रुपये तर तृतीय येणाऱ्या शाळेला एक लाख रुपये असून जिल्हास्तरावर प्रथम पारितोषिके ११ लाख रुपये, द्वितीय पारितोषिके पाच लाख रुपये, तर तृतीय पारितोषिक तीन लाख रुपये आहे. तसेच विभागीय स्तरावर प्रथम पारितोषिके २१ लाख रुपये, द्वितीय पारितोषिके ११ लाख रुपये तर तृतीय येणाऱ्या शाळेला सात लाख रुपये आहे. राज्यस्तरावर ५१ लक्ष रुपयाचे प्रथम पारितोषिके व द्वितीय आलेल्या शाळांना २१ लाख रुपये तर तृतीय ११ लाख रुपये पारितोषिक मिळणार आहे. जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी ‘मुख्यमंत्री माझी शाळा... सुंदर शाळा’ या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन सीईओ डॉ. मैनाक घोष, शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, डॉ. जयश्री राऊत, उपशिक्षणाधिकारी डॉ. निता गावंडे, उपशिक्षणाधिकारी तथा सदस्य सचिव राजू मडावी, विस्तार अधिकारी तथा नोडल अधिकारी प्रणिता गाढवे यांनी केले आहे. 

आयुक्तांनी पाठविली कालदर्शिका

अभियान काळात कोणत्या दिवशी कोणते उपक्रम राबवायचे याची दिशा निश्चित करण्यात आली आहे. त्याबाबत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला ४५ दिवसांची कालदर्शिका पाठविली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना पत्र पाठवून यशस्वीतेसाठी आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांसोबत पालक आणि माजी विद्यार्थ्यांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Students, make the school beautiful... a letter came directly from the Chief Minister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.